नवी दिल्ली - दिल्लीच्या निजामुद्दीनमध्ये 'मर्कज तबलिगी जमात'चा एक कार्यक्रम परवानगीशिवाय आयोजित करण्यात आला होता. येथून तब्बल 2 हजार 361 जणांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती दिल्ली उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली. या कार्यक्रमात सहभागी झालेल्यापैकी 24 जणांची चाचणी करण्यात आली असून त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
सध्या संपूर्ण निजामुद्दीन परिसर सील करण्यात आला आहे. 617 लोकांची तपासणी करण्यात येत आहे. तर इतरांना क्वॉरंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत संचारबंदी लागू असतानाही धार्मिक कार्यक्रम करण्यात आला होता. त्यामुळे सरकारी आदेशांचे उल्लंघन झाले होते. याप्रकरणी साथीचा आजार कायदा आणि भारतीय दंडविधाननुसार मौलाना साद आणि इतर तबलीघी जमात सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिल्लीतील निजामुद्दीन येथे 'मरकज' हा धार्मिक प्रार्थनेचा कार्यक्रम 13 मार्च ते 15 मार्चदरम्यान आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शेकडो लोक सहभागी झाले होते. यातील काही जणांना कोरोनाची लागण झाली होती. यातील 6 जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. यात तेलंगाणामधून गेलेल्या काही जणांचा समावेश होता.