नवी दिल्ली - विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर, अखेर काल (रविवार) एकूण मतदानाची टक्केवारी जाहीर करण्यात आली. दिल्लीमध्ये शनिवारी एकूण ६२.५९ टक्के मतदान झाले. २०१५ साली झालेल्या एकूण मतदानापैकी पाच टक्के कमी मतदानाची नोंद यावेळी झाली.
शनिवारी रात्री उशीरापर्यंत मतदान चालल्यामुळे टक्केवारी जाहीर करण्यास उशीर झाल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते. दुपारी तीन वाजेपर्यंत केवळ ४१ टक्के मतदान पार पडले होते. त्यानंतर रात्री १२ पर्यंत ही संख्या ६२ टक्क्यांपर्यंत गेली. शनिवारी जाहीर झालेले बहुतांश 'एक्झिट पोल्स' हे दुपारी तीन ते पाच पर्यंत झालेल्या मतदानाच्या टक्केवारीवर आधारित होते. मात्र, त्यानंतरही मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याने, हे एक्झिट पोल्स चुकीचे ठरण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
दिल्लीच्या बल्लीमारान मतदारसंघात सर्वाधिक (७१.६६ टक्के) मतदानाची नोंद करण्यात आली, तर कँटॉन्मेंट मतदारसंघात सर्वात कमी मतदानाची नोंद झाली. दिल्ली विधानसभा निवडणुकींचा निकाल ११ फेब्रुवारीला जाहीर होणार आहे.
हेही वाचा : 'भारत आमचा अत्यंत निकटचा मित्र', मादागास्करचे संरक्षण मंत्री रोकोटोनिरिया रिचर्ड यांचे मत