नवी दिल्ली - पोलिसांनी किरकोळ कारणावरुन वाहन चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना दिल्लीतील मुखर्जी नगर भागात घडली आहे. किरकोळ कारणांवरुन सुरू झालेला वाद इतका वाढला, की पोलिसांनी जवळपास अर्धा तास वाहन चालकाला आणि त्याच्या मुलाला काठीने बेदम मारहाण केली. घटनास्थळावर उपस्थित असणाऱ्या लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ग्रामीण सेवा चालक आणि पोलिसामध्ये बाचाबाची झाली. दोघांत वाद इतका वाढला, चालकाने पोलिसावर हल्ला केला. ही सर्व घटना मुखर्जी नगर पोलीस ठाण्याचा जवळच घडली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी धाव घेत वाहन चालकाला आणि त्याच्या मुलाला बेदम मारहाण केली. ही मारहाण जवळपास अर्धा तास चालू होती. यामुळे घटनास्थळावर एकच गर्दी झाली होती.
घटनेची माहिती मिळताच शीख समुदायाच्या लोकांनी मुखर्जी नगर पोलीस ठाण्याबाहेर जोरदार निदर्शने केली. निदर्शन करण्यासाठी दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधनाचे प्रधान मनजिंदर सिंगही उपस्थित होते. यावेळी किंग्सवे रिंग रोड चौक बंद करत पोलिसांविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रकरणावर बोलताना म्हटले आहे, की दिल्ली पोलिसांचे हे कृत्य हिंसक आणि न्यायाला संगत नव्हते. मी या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे. घटनेत दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. यासंबंधी ट्विट करताना त्यांनी लिहिले आहे, की जनतेचे रक्षकांना हिंसक होण्याचा कोणताही अधिकार नाही.
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ट्विट करत घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी लिहिले, सरबजित सिंग आणि बलवंत सिंग यांना दिल्ली पोलिसांनी किरकोळ कारणावरुन ज्याप्रकारे मारहाण केली ते शर्मनाक आहे. अमित शाहांना याप्रकरणी चालकाला न्याय मिळण्यासाठी खात्री केली पाहिजे.