नवी दिल्ली - गुप्तचर अधिकारी अंकित शर्मा यांची दिल्ली हिंसाचारात जमावाने हत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी आणखी ५ जणांना अटक केली आहे. यापूर्वी ७ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यातील मोमिन उर्फ सलमानने गुन्हा कबूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आज(शनिवार) अंकित शर्मा यांच्या हत्येचा शवविच्छेदन अहवालही आला आहे. यामध्ये अंकित शर्माच्या अंगावर ४५ जखमा आढळून आल्या आहेत. यातील १२ चाकूच्या जखमा खोल असल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. सलमान आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून अंकित शर्माची हत्या केल्याचे तपासात उघड झाल्याचे शुक्रवारी एका पोलीस अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले होते.
२५ फेब्रुवारीला चांद बाग परिसरात अंकित शर्मा यांची चाकूने भोकसून हत्या करण्यात आली होती. जवळील एका नाल्यामध्ये त्यांचा मृतदेह टाकण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांचे विशेष पथक तपास करत आहे. आपचे निलंबित आमदार ताहिर हुसेन यांनी हत्या केल्याचा आरोप अंकित शर्माच्या कुटुंबियांनी केला होता. दिल्ली हिंसाचारामध्ये ५० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता.