नवी दिल्ली - दक्षिण पश्चिम दिल्लीच्या पालम पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन आठवड्यापूर्वी पालम गावातील १४ वर्षाची मुलगी बेपत्ता झाली होती. तिचा शोध लावण्यात दिल्ली पोलिसांना यश आले आहे. त्या बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीला महाराष्ट्रातील नागपुरातून ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आले आहे. संतोष सुभाष गबाने असे त्या अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
डीसीपी इंगित प्रतापसिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन आठवड्यापूर्वी पालम पोलीस स्टेशनमध्ये 14 वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखळ झाली होती. त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध घेण्यासाठी एका पथकाची नियुक्ती केली. शोधमोहिमे दरम्यान पोलिसांना एका स्थानिक खबऱ्याने दिलेल्या माहितीमुळे मुलीचा थांगपत्ता लागला. तात्रिकबाबी आणि प्राप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी दिल्ली बाहेरील पोलीस ठाण्यांशी ही संपर्क साधला. त्यानंतर त्यांना त्या मुलीस फूस लावून महाराष्ट्रात नेले असल्याची माहिती मिळाली.
भेटायला बोलावून मुलीला नागपूरला आणले-
पोलिसांच्या पथकाला मुलीचा थांगपत्ता लागला होता. नागपुरात धडकलेल्या दिल्ली पोलिसांनी कारवाई करत त्या मुलीला ताब्यात घेतले आणि तिच्या सोबतच्या व्यक्तीलाही अटक केली. त्यानंतर त्या व्यक्तीकडे चौकशी केली असता, त्याची आणि त्या मुलीची मैत्री आहे. त्याने तिला भेटायला बाहेर बोलावून घेतले होते. त्यानंतर तो तिला थेट नागपूर घेऊन आला असल्याची कबूली आरोपीने दिली.
आरोपीवर खून, चोरी, तस्करी सारखे गुन्हे
पोलिसांना तपासा दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार या मुलीला नागपुरला घेऊन येणाऱ्या आरोपीवर तब्बल २४ गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये खून, तस्करी, चोरी या सारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे.