नवी दिल्ली : कोरोना महामारी आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेली दिल्ली मेट्रो सेवा आजपासून (सोमवार) पूर्ववत होते आहे. असे असले तरी सरकारने नागरिकांना केवळ अत्यावश्यक असतानाच मेट्रोने प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. २२ मार्चपासून बंद असलेली मेट्रो तब्बल १६९ दिवसांनी सुरू होत आहे.
मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ ते १२ सप्टेंबरदरम्यान तीन टप्प्यांमध्ये मेट्रो सेवा पूर्ववत होणार आहे. दिल्लीमधील सम्यपूर बाली ते गुरगावमधील हुडा सिटीला जोडणारी येलो लाईन (लाईन-२) आणि रॅपिड मेट्रो या दोन मार्गांवरील मेट्रो सात सप्टेंबरला सुरू होणार आहेत. पहिल्या टप्प्यांमध्ये सकाळी सात ते ११, आणि सायंकाळी चार ते आठ या वेळांमध्येच मेट्रो धावतील.
कन्टेन्मेंट झोनमध्ये असणाऱ्या स्थानकांवर मेट्रो थांबणार नाही. तसेच, एखाद्या स्थानकांवर फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याचे दिसून आल्यास तेथेही मेट्रो थांबवण्यात येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आज आणि उद्या असे दोन दिवस ५७ गाड्यांच्या ४६२ फेऱ्या होतील. नऊ तारखेनंतर या फेऱ्यांमध्ये आणि गाड्यांमध्ये वाढ करण्यात येईल. तसेच पुढील पाच दिवसांमध्ये इतर मार्गांवरील सेवाही सुरू करण्यात येईल.
दिल्लीचे परिवाहन मंत्री कैलाश गहलोत यांनी रविवारी राजीव चौक मेट्रो स्थानकाला भेट देत सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. सध्या १७ स्थानकांवर ऑटोमेटेड थर्मल स्कॅनर आणि सॅनिटायझर डिस्पेंसर बसवण्यात आले आहेत. इतर ठिकाणी ऑटोमेटेड सॅनिटायझर डिस्पेंसर आहेत, मात्र थर्मल स्कॅनिंग हे गन्सच्या माध्यमातूनच होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
तसेच, १६ मेट्रो स्थानकांवरील लिफ्टचे बटन बंद करण्यात आले असून, त्याजागी फूट-पॅडल बसवण्यात आले आहेत. ज्यामुळे लोक पायांनीच लिफ्ट बोलावू शकतील. तसेच, आतमध्ये गेल्यानंतरही नागरिकांनी कोणतेही बटन दाबण्याची आवश्यकता नाही, लिफ्ट पूर्णपणे स्वयंचलित करण्यात आल्या आहेत. लिफ्टमध्ये एका वेळी तीनच व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबई आणि कोलकातामधील मेट्रो सुविधा अद्याप सुरू होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.