नवी दिल्ली - देशाची राजधानी दिल्लीमध्ये सोमवारपासून लॉकडाऊनमध्ये काहीशी सूट मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज दुपारच्या सुमारास याबाबतची घोषणा करण्याची शक्यता आहे.
सध्या दिल्लीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापने बंद आहेत. यामध्ये आता काहीशी सूट मिळू शकते. शनिवारी दिल्ली कॅबिनेटची महत्त्वाची बैठक पार पडली. यामध्ये इतर आस्थापनांनाही सूट दिली जावी आणि सरकारचे सर्व विभाग थोड्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सुरू करावेत, यावर चर्चा झाली असून त्यासंदर्भात आदेशही काढण्यात आला आहे.
सरकारी कार्यालयांचे वर्ग-अ आणि वर्ग-बचे कर्मचारी कर्तव्यावर येऊ शकतात. वर्ग-क आणि त्याहून खालचे कर्मचारी सुरक्षित अंतर राखण्याचे नियम पाळत 33 टक्के कर्मचारी काम करू शकतात, असे दिल्ली गृहमंत्रालयाच्या आदेशात म्हटले आहे.
दरम्यान, 20 एप्रिलपासून राज्य सरकारे त्यांच्या जबाबदारी आणि परिस्थितीनुसार लॉकडाऊनमध्ये सूट देऊ शकतात, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार आज मुख्यमंत्री केजरीवाल दिल्लीतील लॉकडाऊनमध्ये काहीशी सूट देऊ शकतात असे सांगण्यात येत आहे.