नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत केजरीवाल सरकार आणि उपराज्यपाल अनिल बैजल पुन्हा एकदा समोरासमोर आले आहेत. शुक्रवारी उपराज्यपाल अनिल बैजल यांनी केजरीवाल सरकारच्या अनलॉक -3 मधील दोन महत्त्वपूर्ण निर्णय नाकारले आहेत.
केजरीवाल सरकारने दिल्ली येथे हॉटेल सुरू करण्याची आणि ट्रायल बेसिसवर एका आठवड्यासाठी बाजार सुरू करण्याची परवानगी दिली होती. मात्र, उपराज्यपाल अनिल बैजल यांनी केजरीवाल सरकारचे हे दोन्ही निर्णय नाकारले आहेत.
मुख्यमंत्र्यांसमवेत दिल्लीतील परिस्थितीवर चर्चा झाली. राजधानीमधील स्थिती सुधारण्याची गरज आहे. मात्र, परिस्थिती नाजूक असून धोका टळलेला नाही. म्हणूनच सावध आणि पुराणमतवादी दृष्टीकोन आवश्यक आहे, असे उपराज्यपाल बैजल यांनी म्हटलं आहे.
केंद्र सरकारने दिल्ली सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करणे थांबवावे, असे उपराज्यपाल अनिल बैजल यांच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आम आदमी पक्षाने म्हटले.
दरम्यान, यापूर्वीही राज्यपाल यांनी केजरीवाल यांच्या निर्णयाला नाकारले होते. दिल्ली सरकारच्या रुग्णालयात फक्त दिल्लीतील कोरोना रुग्णांवरच उपचार केले जातील, असे निर्देश केजरीवाल यांनी दिले होते. मात्र, त्यावर उपराज्यपालांनी संबंधित विभाग आणि प्रशासनाला दुसर्या राज्यातून आलेल्या कोणत्याही व्यक्तीवर उपचार करण्यास नकार देऊ नये, असे निर्देश दिले होते. दिल्लीचे खासदार गौतम गंभीर आणि कुमार विश्वास यांनी केजरीवाल सरकारच्या निर्णयाला नाकारल्याबद्दल उपराज्यपालचे कौतुक केले होते.