नवी दिल्ली - नुकताच राज्य सरकारने खासगी रुग्णालयात कोरोना उपचाराचा खर्च मर्यादित केला आहे. पण अनेक रुग्णालये आजही रुग्णांना दाखल होण्याआधी दर सांगत नाहीत. खासगी रुग्णालयांतून अनेक तक्रारी यायला लागल्या आहेत. ही रुग्णालये कोरोना रुग्णांचे फोन स्वीकारत नाहीत किंवा सुरुवातीचे डिपाॅझिट भरून दाखल व्हायला सांगतात. पण तज्ज्ञांच्या मते रुग्णाने काळजी करण्याची काही गरज नाही. कारण त्यातल्या बऱ्याच जणांना रुग्णालयात दाखल व्हायची गरज नसते आणि घरीच विलगीकरणात राहून त्यांच्यावर उपचार करता येऊ शकतो.
गेल्या काही दिवसांत ईटीव्ही भारतने दिल्लीतल्या काही रुग्णालयांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यात मॅक्स, सर गंगाराम, बीएल कपूर आणि व्यंकटेश्वर रुग्णालय, अशी काही नावे होती. यांच्याशी बोलताना ते फोनवर काय म्हणाले हे जाणून घेण्यापेक्षा दिल्लीत कोरोनाची काय परिस्थिती आहे, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
दिल्लीतला कोरोना -
दिल्ली सरकारच्या आकडेवारीनुसार देशाच्या राजधानीत कोरोनाची परिस्थिती सुधारत आहे. दिल्लीत १,२२,७९३ कोरोना रुग्ण आहेत, तर ३,६२८ जणांचा कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत मृत्यू झाला आहे. दिल्लीत अॅक्टिव्ह रुग्ण १६,०३१ आहेत. त्यापैकी ८,८१९ जणांना घरीच विलगीकरण करून ठेवले आहे. दिल्लीमध्ये सरकारी रुग्णालयांत कोरोना रुग्णांसाठीचे १२,००० बेड्स रिकामे आहेत.
काय आहेत खर्चाच्या मर्यादा?
कोरोनाची भीती प्रचंड होती, तेव्हा खासगी रुग्णालये रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळत होती. त्या दिवसात तर रुग्णालये कोरोना रुग्णांना दाखल करून घ्यायलाही तयार नव्हती. कुणी दाखल झालाच, तर दर लाखात असायचा. हे सर्व पाहिल्यानंतर सरकारने कोरोना रुग्णांचे वेगवेगळ्या श्रेणी करून उपचाराच्या खर्चावर मर्यादा आणली. रुग्णालये अधिसूचना दरापेक्षा जास्त दर आकारू शकत नाहीत. हे दर प्रत्येक दिवसाप्रमाणे आहेत.
- रुपये ८,००० ते रुपये १०,००० आयसोलेशन बेड
- रुपये १३,००० ते रुपये १५,००० व्हेन्टिलेशनशिवाय आयसीयू
- रुपये १५,००० ते रुपये १८,००० व्हेन्टिलेशनसह आयसीयू
(यात पीपीई किट्सचे दरही आहेत)
ईटीव्ही भारतने अनेक रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांना दाखल करण्याबद्दल चौकशी केली. तेव्हा सर गंगाराम रुग्णालय सोडले ,तर बाकी कुणीच सरळ उत्तरे दिली नाहीत.
कोरोना रुग्णांच्या प्रवेशासंदर्भात मॅक्स हॉस्पिटल, साकेत यांना वेगवेगळ्या वेळी तीन ते चार कॉल करूनही काही कळले नाही. फोन घेणारी व्यक्ती दरवेळी संबंधित व्यक्तीकडे कॉल ट्रान्सफर करते आणि तो फोन डिस्कनेट होतो.
सर गंगाराम रुग्णालयाकडून सकारात्मक प्रतिसाद -
सर गंगाराम रुग्णालयाकडून मिळालेला प्रतिसाद उत्तम होता. ज्या व्यक्तीने फोन घेतला त्याने कोरोना रुग्णांसाठी बेड्स किती उपलब्ध आहेत, ते सांगितले. कोरोना रुग्णाची स्थिती कशी आहे, हे विचारून रुग्णाला दाखल करण्याचाही सल्ला दिला. त्यांनी गरज असेल तर व्हेंटिलेटर उपलब्ध असल्याचेही सांगितले. त्याचे दरही सांगितले. शिवाय फोन घेणाऱ्याने इतर दरही सांगितले.
बीएल कपूर आणि वेंकटेश्वर रुग्णालय -
जेव्हा बीएल कपूर रुग्णालयाला फोन केला तेव्हा आम्हाला अगोदर रुग्णाला दाखल करायला सांगितले आणि त्यानंतर उपचाराचा खर्च कळेल, असे सांगण्यात आले. आम्ही जेव्हा त्यांना अंदाजे किती खर्च होईल , हे विचारले तेव्हा रुग्णाला रुग्णालयात दाखल केल्याशिवाय उपचाराच्या खर्चाबद्दल काही सांगता येणार नाही, असे उत्तर मिळाले. आम्ही कोरोना रुग्णाचा व्हेंटिलेटर खर्च किती होईल , हे विचारले तर रुग्णाला दाखल केल्यावरच खर्च सांगितला जाईल, असे सांगण्यात आले.
याबद्दल तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे?
कन्फेडरेशन ऑफ मेडिकल असोसिएशन ऑफ एशिया आणि ओशिनियाचे अध्यक्ष डॉ. केके अग्रवाल म्हणाले, दिल्लीच्या १५ ते २० टक्के लोकसंख्येला आधीच कोरोना झाला आहे. सरकारने कोरोना उपचाराचे दर कमी केले आहेत आणि रुग्णालयांना हे दराचे नियम पाळणे अनिवार्य आहे. एखाद्याला काही लक्षणे नसतील आणि ऑक्सिजनची गरज नसेल तर त्याला रुग्णालयात दाखल करायची गरज नाही. एखाद्याला दाखल करणे जरुरी असेल तर तो रुग्ण रुग्णालयात जाऊ शकतो. तिथे त्याला जास्त पैसे आकारले जाणार नाहीत.
- सुनील कुमार (ईटीव्ही, भारत दिल्ली)