नवी दिल्ली - काश्मीरी गेट भागात शनिवारी एक तरुणी आपल्या स्कूटीवरून जात असताना मोबाईलवर बोलत होती. ही गोष्ट एका वाहतूक पोलिसाच्या निदर्शनास येताच त्याने त्या तरुणीला हटकले आणि दंडात्मक कारवाई करण्यासाठी थांबवले. त्यावर त्या तरुणीने, दंड भरण्यास नकार देत चांगलाच गोंधळ घातला. पोलिसांची हुज्जत घालत तिने आपले हेल्मेटही जमिनीवर आदळले. रस्त्यावर बराच वेळ हा गोंधळ सुरु होता. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी आधीच गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलत होती. तिच्या गाडीची नंबर प्लेटदेखील तुटली होती. सोबतच, तिने हेल्मेटही लॉक न करता, चुकीच्या पद्धतीने घातले होते. या सर्व प्रकरणांमध्ये दंड करण्यासाठी तिला पोलिसाने अडवले होते. तर, ती तरुणी बराच वेळ पोलिसांशी हुज्जत घालत होती.
हेही वाचा : महाविद्यालयातील वादग्रस्त ड्रेस कोडच्या निषेधार्थ विद्यार्थिनींचे आंदोलन
आधी केली विनवणी, नंतर घातला गोंधळ...
पोलिसांनी पकडल्यानंतर आधी या तरुणीने आपल्याला दंड न करण्याची विनंती केली. रडत रडत तिने पोलिसांना सांगितले की तिचे हातही भीतीने थरथरत आहेत. त्यानंतरही पोलिसाने तिला दंड भरण्यास सांगितले. तेव्हा मात्र, आपला पवित्रा बदलत तिने आपले हेल्मेट फेकून देत, पोलिसांशी हुज्जत घालत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. सोबतच तिने पोलिसांना, कारवाई केल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली.
पोलिसांनी समज देत सोडले...
जवळपास वीस मिनीटे चाललेल्या या गोंधळानंतर, पोलिसांनी अखेर तिला केवळ समज देत, दंड न आकारता जाऊ दिले. आणि यापुढे असे न करण्याची ताकीद दिली.
हेही वाचा : मुस्लीम बांधवांनी जानवे घालून केले हिंदू ब्राह्मणावर अंत्यसंस्कार...