नवी दिल्ली - राजधानी काबीज करण्याचे भाजपचे स्वप्न अधुरेच राहिले आहे. देशभरातील जवळपास दोनशे भाजपच्या नेत्यांनी दिल्ली निवडणुका जिंकण्यासाठी कस लावला. मात्र, त्यांच्या पदरी सत्तेचा वनवासच आला आहे. मागील २२ वर्षांपासून भाजप दिल्लीच्या सत्तेपासून दूर आहे. स्थानिक मुद्दे महत्त्वाचे असल्याचे दिल्ली निवडणुकांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.
फक्त राष्ट्रीय मुद्द्यांवर निवडणुका लढता येत नाही. जनतेला रोजचे जीवन जगताना येणाऱ्या अडचणी जो पक्ष सोडवेल त्यांनाच सत्तेच्या चाव्या मिळतील हे आज सिद्ध झाले. स्थानिक चेहऱ्यांना पुढे करूनही निवडणुका जिंकता येतात, हेही दिसून आले. मात्र, भाजपच्या मतांची टक्केवारी वाढल्याचे सर्वांना मान्य करावे लागेल. मागच्या निवडणुकीत भाजपला ३२ टक्के मते मिळाली होती, तर या निवडणुकीत ४० टक्के मते मिळाली आहेत.
कोणत्या मुद्द्यांचा 'आप'ला झाला फायदा
- शिक्षण क्षेत्रात आप सरकारने केलेली कामे. सरकारी शाळांमधील शिक्षणांचा दर्जा वाढवला. शाळांच्या शुल्कावर नियंत्रण आणले. या निर्णयामुळे मध्यम वर्गाला दिलासा मिळाला.
- २०० युनिट पर्यंत मोफत वीज या निर्णयामुळे मध्यम वर्गामध्ये केजरीवाल यांना प्रसिद्धी मिळाली.
- भाजपने अवैध घरांना वैध केले. मात्र, या कामास उशीर झाला होता. तोपर्यंत निवडणुका तोंडावर आल्या होत्या.
- अल्पसंख्यक आणि अनुसूचित जातीच्या लोकांनी आपला साथ दिली, हे प्राथमिक दृष्या दिसून येते. पारंपरिक रित्या हा वर्ग काँग्रेसचा चाहता होता. मात्र, या निवडणुकीत काँग्रेस स्पर्धेत नव्हती. यातील काही मतांचा हिस्सा आपकडे वळला.
- शाहीन बाग आंदोलनाचाही आपला फायदा झाला. शाहीन बाग आंदोलनापासून आपने स्वत:ला दूर ठेवले. तसेच विकासाच्या मु्द्द्यांवर बोलत राहीले. तर भाजप शाहीन बाग, हिंदुत्व, पाकिस्तानच्या मुद्द्यांवर बोलत राहिले.
- प्रचारा दरम्यान अरविंद केजरीवाल यांनी हनुमान चालिसाचे पठन केले. यातून ते हिंदुंच्या विरोधात नाहीत, असे दाखवून दिले.
- मोहल्ला क्लिनिकने दिल्लीतील मध्यम वर्गाला आरोग्य सेवा सहज स्वस्तात उपलब्ध झाली. मध्यमवर्ग केजरीवाल यांच्या मागे उभे राहण्यातील हा एक महत्त्वाचा निर्णय ठरला. तसेच महिलांसाठी मोफत बस सेवेचा निर्णयही घेण्यात आला.
- काँग्रेस निवडणुकीत आक्रमक न झाल्याने निवडणूक फक्त आप आणि भाजपमध्येच झाली. अन्यथा तीन पक्षांची निवडणूक म्हणून चित्र उभे राहिले असते. याचा कदाचित भाजपला फायदा झाला असता.
- केजरीवाल यांच्या तुलनेत भाजप दिल्ली अध्यक्ष मनोज तिवारी यांनी प्रतिमा कमी पडली.
- विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवावी की, शाहीन बाग, भारत पाकिस्तान या मुद्द्यांवर निवडणूक लढवावी यावरून भाजपमध्ये मतभेद होते.
- भाजपने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला नाही. नाहीतर परिस्थिती कदाचित वेगळी असती.
- केजरीवाल सरकार कामांबरोबरच जाहीरांतीमध्येही सरस राहीले. अनेक वृत्तपत्रांमध्ये मोठ्या जाहीराती, प्रेस कॉन्फसन्स, मोबाईल अॅपद्वारे प्रचार, याचा आपला फायदा झाला.