नवी दिल्ली - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे काही दिवस ऑनलाईन फुड डिलीवरी देखील बंद करण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा फुड डिलीवरीला परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या भीतीने नागरिक जेवण मागवणे टाळत आहेत. दरम्यान नैऋत्य दिल्ली परिसरात असणाऱ्या 'इन्स्टापिझ्झा' या दुकानाने कोरोनाच्या काळातही आपला व्यवसाय सुरू ठेवण्यात यश मिळवले आहे.
दिल्लीमध्ये एक फुड डिलीवरी करणारा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पिझ्झाची मागणीदेखील अचानक कमी झाली. मध्यंतरी आम्हाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. मात्र, ही बाब आम्ही एक आव्हान म्हणून स्विकारली. दुकानात पिझ्झा तयार करतानाचे लाईव्ह फुटेज आम्ही ग्राहकांना दाखवायला सुरुवात केली. कर्मचारी किती काळजीने पिझ्झा तयार करतात याची खात्री पटल्याने ग्राहकांच्या ऑर्डर्स येणे सुरू झाले, अशी माहिती इन्स्टापिझ्झा दुकानाचे व्यवस्थापक सुंदर यांनी दिली.
दुकानात काम करणारे सर्व कर्मचारी सॅनिटायझर, मास्क, शुजकव्हरचा वापर करतात. सध्या दुकानात सर्वांत जास्त महत्त्व हे स्वच्छतेला दिले जात आहे. आपल्याला मिळणारा पिझ्झा कसा तयार होतो हे ग्राहकांना थेट दिसत असल्याने लॉकडाऊनमध्येही इन्स्टापिझ्झाने आपले ग्राहक गमावले नाहीत.