नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीला गालबोट लागले. या हिंसाचारात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले. दिल्ली गुन्हे शाखेच्या पथकाने हिंसाचार करणाऱ्या काही आरोपींची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. ही छायाचित्रे पोलिसांना विविध फुटेजमधून प्राप्त झाले आहेत. यापूर्वी गुन्हे शाखेने डझनभर आरोपींचे छायाचित्र प्रसिद्ध केले होते. तसेच लाल किल्ल्यावरील हिंसाचार प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली.
प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारासंदर्भात आतापर्यंत 45 प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. यापैकी 14 प्रकरणांचा तपास दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेमार्फत करण्यात येत आहे. तर इतर प्रकरणांची स्थानिक पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. गुन्हे शाखेच्या तपासात लाल किल्ला, मुकरबा चौक, गाझीपूर, आयटीओ, नांगलोई येथील हिंसाचाराच्या घटनांचा समावेश आहे. या प्रकरणांच्या तपासादरम्यान संशयित आरोपींची छायाचित्रे दिल्ली पोलिसांना देण्यात आली आहेत. हे आरोपी हिंसाचारात सामील असल्याचे ठाम पुरावे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंसाचाराच्या घटनांमध्ये शेतकरी नेत्यांना लवकरच चौकशीसाठी बोलावले जाईल. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये 200 ट्रॅक्टरच्या मालकांना गुन्हे शाखेची नोटीस बजावण्यात आली आहे. याशिवाय 60 संशयितांविरूद्ध लूक आऊट परिपत्रके काढण्यात आली आहेत.