नवी दिल्ली - देशातील पहिले पोस्ट कोविड केंद्र आज (गुरुवार) दिल्लीत सुरू होत आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या केंद्राचे उद्घाटन करणार आहेत. ताहीरपूरमधील राजीव गांधी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हे केंद्र आजपासून सुरू होणार आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर काही वेगळ्या प्रकारचे आजार, समस्या जाणवत असतील तर अशा रुग्णांना या केंद्राशी संपर्क साधून उपचार घेता येतील.
काही रुग्णांना कोरोनामुक्त झाल्यानंतरही ठराविक लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे अशा रुग्णांनी या केंद्राकडे संपर्क करावा. हे देशातील पहिलेच पोस्ट कोविड केंद्र असून आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन याचे उद्घाटन करणार आहेत, असे डॉ. बी एल शेरवाल यांनी सांगितले.
हेही वाचा - काश्मीरमधून तब्बल दहा हजार सैनिकांना तातडीने बोलावले परत; गृहमंत्रालयाचे आदेश
दिल्ली परिसरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनातून बरे झाल्यानंतर इतर आजार झाल्याचे किंवा सर्दी ताप आल्याचे रुग्ण आढळून आले आहेत. दम लागणे, श्वास घेण्याची पातळी मंदावणे असे काही प्रकार समोर आले आहेत, त्यांचे पुन्हा सीटी स्कॅन करण्यात येणार आहेत. काहींना मानसिक लक्षणे असल्यास त्यांना योग आणि व्यायामाद्वारे बरे करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हे केंद्र मुख्य कोविड केंद्रापासून वेगळ्या ठिकाणी असणार आहे आणि येथे फक्त कोरोनामुक्त झाल्यानंतर त्रास उद्भवलेल्या रुग्णांवरच उपचार केले जातील, असेही शेरवाल यांनी सांगितले.
हेही वाचा - 'नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी' : विविध सरकारी नोकऱ्यांसाठी आता एकच सामायिक पूर्वपरीक्षा!