नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची आज कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यांना घशाचा त्रास होत असून ताप आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. कोरोना तपासणीसाठी अरविंद केजरीवाल यांचे नमुने घेण्यात आले आहेत. तपासणीचा अहवाल आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत येण्याची शक्यता आहे.
थोडासा ताप आणि घशात त्रास होत असल्याने 51 वर्षीय मुख्यमंत्री स्वतःहून विलगीकरणात गेले होते. त्यांनी रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजेरी लावली होती. त्यानंतर ते कोणत्याही बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. मात्र, आता केजरीवाल यांचा ताप कमी झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
केजरीवाल यांची 2016 मध्ये बंगळुरूमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. कोरोनाच्या संकट काळात दिल्ली सरकार पुरेसे प्रयत्न करत नसल्याचा आरोप केंद्र सरकार करत आहे. अशा स्थितीत दिल्लीचे मुख्यमंत्री हे कोरोना चाचणीला सामोरे गेले आहेत. त्यामुळे दिल्लीकरांची चिंता वाढली आहे.