नवी दिल्ली - दिल्ली हिंसाचारात मृत्यू झालेल्या आयबी विभागातील कर्मचारी अंकित शर्माच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपये देण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. आज झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली.
'दिल्लीत झालेल्या दंगलीमध्ये अंकित शर्माला ठार मारण्यात आले. आम्ही त्याच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपये देत आहोत. आज मंत्रिमंडळात हा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या प्रसारामुळे हा निर्णय रखडला होता. या आठवड्यात त्याच्या कुटुंबीयांना हे पैसे मिळतील अशी आशा आहे', असे ट्विट अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीवरून दिल्लीमध्ये फेब्रुवारी महिन्यांमध्ये दंगल उसळली होती. यामध्ये आयबी विभागातील कर्मचारी अंकित शर्मा याची हत्या झाली होती. चांद बाग परिसरातील नाल्यामध्ये २६ फेब्रुवारीला अंकितचा मृतदेह आढळून आला होता. या जातीय दंगलीत ५० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर अनेकजण जखमी झाले होते.