नवी दिल्ली – प्रत्यक्ष ताबारेषेवरील स्थितीबाबत हवाई दलाच्या कमांडरच्या परिषदेत आज चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी कोरोना महामारीत काम करणाऱ्या हवाई दलाचे कौतुक केले.
हवाई दलाच्या परिषदेत संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले, की आव्हानात्मक परिस्थितीत भारतीय हवाई दलाचे काम नेहमीच कौतुकास्पद राहिले आहे. कोरोना महामारीच्या संकटातही हवाई दलाकडून देशासाठी देण्यात आलेले योगदान खूप कौतुकास्पद आहे.
हवाई दलाची तीन दिवसीय परिषद आजपासून सुरू झाली आहे. या परिषदेचे अध्यक्षपद भारतीय हवाई दलाचे प्रमुख राकेश कुमार सिंग भदोरीया हे भूषिवत आहेत. देशाच्या हवाई संरक्षण व्यवस्थेवर परिषदेत सखोल चर्चा करण्यात येणार आहे. तसेच त्यामध्ये हवाई संरक्षण व्यवस्थेचा आढावा घेण्यात येणार आहे. येत्या दशकामध्ये हवाई दलाचा क्षमतेच्या विस्ताराचे नियोजन करण्यावरही परिषदेत चर्चा करण्यात येणार आहे. ‘येत्या दशकांत भारतीय हवाई दल’ ही परिषदेची संकल्पना आहे.
पूर्व लडाखमध्ये चीनबरोबर देशाचे संबंध ताणलेले आहेत. या पार्श्वभूमीवर हवाई दलाची ही परिषद महत्त्वपूर्ण मानली जात आहे.