देहराडून (टिहरी) - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक बंद आहे. नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या दरम्यान एक वेगळीच घटना उत्तराखंडमधून समोर आली आहे. टिहरी येथील रहिवासी असलेल्या कमलेश भट्ट या तरुणाचा १६ एप्रिलला दुबईमध्ये संशयास्पद मृत्यू झाला. त्याचा मृतदेह भारतात तर आणला मात्र, विमानतळावरुनच मागे पाठवण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ता रोशन रतुडी यांनी अथक प्रयत्न केल्यानंतर २३ एप्रिलला दुबईच्या आबूधाबी विमानतळावरुन एका कार्गो विमानात कमलेशचा मृतदेह भारतात पाठवण्यात आला. मात्र, त्याच रात्री भारतीय दुतावासातून आदेश आले की, परदेशातून भारतात येणारा कोणताही मृतदेह स्विकारू नये. त्यामुळे दिल्ली विमानतळावरुन कमलेशचा मृतदेह परत दुबईला पाठवण्यात आला. त्याच्या नातेवाईकांनी केंद्र आणि राज्य शासनाकडे त्याचा मृतदेह भारतात परत आणण्याची मागणी केली आहे.
टिहरीतील सेमवाल गावचा रहिवासी असलेला कमलेश मागील तीन वर्षांपासून अबूधाबी हॉटेलमध्ये काम करत होता. १६ एप्रिलला रात्री अचानक त्याची प्रकृती खराब झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मात्र, त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.