बंगळुरु - कर्नाटकातील बेळगाव येथील अथानी तालुक्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. मृत व्यक्तीस कोरोना असल्याच्या भीतीने नातेवाईकांनी मदत करण्यास नकार दिल्याने महिलेला आपल्या पतीचा मृतदेह हातगाड्यावरून स्मशानभूमीत न्यावा लागला होता.
कोरोना संशयित व्यक्तीचे दोन दिवसांपूर्वीच निधन झाले होते. मात्र, कोरोना संसर्गाच्या भितीने अंत्यसंस्कारासाठी शेजारी आणि नातवेवाकांनी पाठ फिरवली. या कठीण परिस्थितीमध्ये महिलेने आपल्या मुलाच्या मदतीने हात गाड्यावरून पतीचा मृतदेह स्मशानभूमीत नेला आणि अंत्यसंस्कार विधी पार पाडला. दरम्यान अंत्यसंस्काराच्या काही वेळानंतर मृत व्यक्तीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, कर्नाटकमध्ये गेल्या शुक्रवारी 3 हजार 693 रुग्ण आढळले असून 115 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण 55 हजार 115 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर त्यातील 33 हजार 205 रुग्ण सध्या सक्रिय असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 20 हजार 757 जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहेत. तर 1 हजार 147 जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे.
कोरोनाबाधित मृतदेहाची विटंबना होत असल्याची अनेक उदाहरणे पुढे येत आहे. भीतीपोटी नातेवाईक रुग्णालयाने शासकीय नियमानुसार योग्य आवरणात बांधून दिलेल्या मृतदेहाला स्पर्श करण्याचे टाळत आहेत. त्यामुळे रुग्णालयीन कर्मचारी किंवा पोलिसांना ही कामे करावी लागत आहेत. यामुळे मृत शरीराच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याच्या घटना घडत आहेत.