करनाल - कोरोना विषाणूमुळे आज जगभरातील नागरिक त्रस्त आहेत. ऑस्ट्रेलिया येथे देखील कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत हरियाणा येथील युवती ऑस्ट्रेलियातील भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी समोर आली आहे. करनाल येथील निसिंग कस्बा येथे राहणारी शगनदीप कौर ही व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढे आली आहे.
शगनदीप कौर ही ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये इनफार्मेशन टेक्नोलॉजीचा अभ्यास करत आहे. मागच्या २ वर्षापासून ती ऑस्ट्रेलिया येथे वास्तव्यास आहे. कोरोनामुळे ऑस्ट्रेलिया सरकारने विद्यार्थ्यांसाठी कोणतीही सुविधा पुरवली नाही, तेव्हा शगनदीपने मदतीसाठी आपला हात पुढे सरसावला आहे. तिने व्हॉट्सअपच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या इतर भारतीय विद्यार्थ्यांसाठी हेल्पिग अॅट रिस्क नावाचा ग्रुप तयार केला आहे. याद्वारे ती या विद्यार्थ्यांपर्यंत राशन पुरवण्याची मदत करत आहे.
यासंबधी शगनदीपने ईटीव्ही भारतशी संवाद साधला आहे.
ऑस्ट्रेलियात कोरोनामुळे अनेक भारतीय विद्यार्थी बेरोजगार झाले आहेत. यापैकी कोणी घरकाम किंवा हॉटेलमध्ये काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. सध्या पर्यटनही बंद असल्याने या विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.