नवी दिल्ली - हिवाळा आणि सणासुदीचा हंगाम जवळ येत असतानाच नीती आयोगाने देशात कोविड -19 ची दुसरी लाट येण्याचा धोका असल्याचा इशारा दिला आहे. राष्ट्रीय कोविड -19 टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत हा धोका असल्याचे सांगितले.
'आपली आरोग्य यंत्रणा आता याचा मुकाबला करण्यास सज्ज झाली आहे, त्यामुळे मृत्यूचे प्रमाण खूपच कमी असेल, असे ते म्हणाले.
'या विषाणूचे स्वरूप आणि युरोप आणि अमेरिकेत (यूएसए) होणारी कोविड रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढणारी संख्या लक्षात घेता, कोविड - 19 ची प्रकरणे वाढतील, असे दिसत आहे. हिवाळ्यामध्ये या विषाणूची वाढ होण्याची प्रवृत्ती असल्याने हिवाळ्यात त्याचे संक्रमण वाढेल, उलट ते पूर्वीपेक्षा जास्त असेल, असे आम्हाला वाटते,' असे डॉ. पॉल म्हणाले.
डॉ. पॉल यांनी हिवाळ्याच्या वेळी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे सांगितले. 'लोक उत्सव, सणांच्या वेळी एकत्र येऊ नयेत. नाहीतर या विषाणूचा प्रसार एका 'सुपर स्प्रेडर इव्हेंट'सारखा होऊ लागेल,' असे ते म्हणाले.
हेही वाचा - आखाती देशातील भारतीय मजुरांची जीवन-मृत्यूची झुंज, संकटग्रस्तांना मदतीचा हात देण्याची गरज
'आता हे स्पष्ट झाले आहे की, कोविड -19 चा संसर्ग झालेले रुग्ण लक्षणे दिसणे सुरू होण्याच्या 2-3 दिवस आधीच विषाणूचा प्रसार करण्यास सुरवात करत आहेत. अशा परिस्थितीत ते जर एखाद्या मेळाव्याच्या ठिकाणी असतील तर, ते हा रोग बर्याच लोकांपर्यंत पसरवतील,' अशी भीती डॉ. पॉल यांनी व्यक्त केली.
पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाच्या सेंटर फॉर कंट्रोल ऑफ क्रॉनिक कंडिशन्सचे संचालक डॉ. प्रभाकरन दुराईराज म्हणतात, 'हिवाळ्यात सर्व विषाणूजन्य आजार वाढतात. परंतु सार्स-केओव्ही उन्हाळ्यामध्येही पसरतच आहेत. पण इतर देशांकडे पाहिले तर, हिवाळा सुरू झाल्यांनंतर भारतात दुसरी लाट येऊ शकेल.' प्रदूषणामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, माहिती व प्रसारण मंत्रालया येत्या काळातील सण सण, हिवाळा आणि अर्थव्यवस्था सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जनजागृती करत आहे.
हेही वाचा - अनलॉक 5 : चित्रपटगृहे, शाळा आजपासून उघडणार...