भोपाळ- गुना येथे एका मागासवर्गीय जोडप्याला मारहाण केल्याप्रकरणी गुरुवारी मध्य प्रदेश सरकारने सहा पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले. गुना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक (एसपी) आणि ग्वाल्हेरचे महानिरीक्षक (आयजी) यांना यापूर्वीच पदावरुन हटवण्यात आले आहे.
गुना येथून बदली करण्यात आलेले पोलीस अधीक्षक तरुण नायक यांनी दोन महिला पोलिसांसह सहा पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश जारी केले. अशोकसिंग कुशवाह, राजेंद्र शर्मा, पवन यादव, नरेंद्र रावत, नीतू यादव आणि राणी रघुवंशी यांना निलंबित करण्यात आले.
मध्य प्रदेशातील २५ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत भाजप सरकारने बुधवारी रात्री जिल्हाधिकारी एस. विश्वनाथन, पोलीस अधीक्षक नायक आणि आयजी राजाबाबू सिंग यांची बदली केली, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती ही गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिली आहे.
मंगळवारी, एका मागासवर्गीय जोडप्याला गुना शहरातील सरकारी जमिनीतून बाहेर काढण्यावरुन मारहाण झाली होती. यानंतर त्यांनी कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. सरकारी जमीन एका कॉलेजला देण्यात आली आहे.
राजकुमार अहिरवार (३८) आणि त्याची पत्नी सावित्री (३५) यांनी अतिक्रमण केलेल्यांकडून जमीन भाडेतत्वावर घेतली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी त्यांना जमिनीवरुन जबरदस्तीने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्या दोघांनी कीटकनाशके प्राशन केले. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये जाण्यासही नकार दिला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये पोलिसांनी राजकुमार अहिरवारला लाठ्या-काठ्या मारल्याचे दिसून आले होते. याघटनेला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे.
या जमिनीवर अतिक्रमण केलेले गब्बू पारडी हे काँग्रेसचे कार्यकर्ते असून त्यांचे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांशी संबंध होते, असा आरोप मध्य प्रदेश भाजप अध्यक्ष विष्णु दत्त शर्मा यांनी केला. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. सरकारने ती अतिशय गंभीरपणे घेतलीय आणि जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि आयजी यांना पदावरुन काढून टाकले, असे त्यांनी सांगितले.
भाजपच्या शर्मा यांनी केलेले आरोप निराधार आहेत. पारडी हे भाजपचे कार्यकर्ते होते, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आणि माजी मंत्री जितू पटवरी यांनी केला. या प्रकरणी एका विद्यमान न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली चौकशी करावी आणि वरिष्ठ अधिका-यांना निलंबित करा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते भूपेंद्र गुप्ता यांनी केली.