धर्मशाळा : तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांच्या ८५व्या वाढदिवसानिमित्त, २०२० हे "कृतज्ञता वर्ष" म्हणून साजरे केले जाणार असल्याची घोषणा तिबेटने केली आहे.
केंद्रीय तिबेट प्रशासनाचे सिक्योंग (प्रमुख) लोबसांग सांगे यांनी याबाबत माहिती दिली. आम्ही तिबेटी नागरिकांना, आणि जगभरातील आमच्या मित्रांना असे आवाहन करतो, की धर्मगुरुंनी सांगितलेल्या चार वचनांबाबत त्यांनी जनजागृती करावी. आपण सर्व एका मोठ्या संकटामधून जात आहोत. जगभरात सुमारे ५० लाखांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या विषाणूचा तडाखा बसलेल्या सर्व देशांसाठी, आणि याचा बळी गेलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आम्ही प्रार्थना करतो, असेही ते म्हणाले.
१९५९मध्ये दलाई लामांना आपले कार्य करण्यासाठी देश सोडावा लागला. तेव्हापासून ते अविरतपणे जगात शांततेचा प्रसार करत आहेत. तिबेटचा प्रत्येक नागरिक त्यांचे कार्य, त्यांचा त्याग जाणून आहे. आतापर्यंत झालेल्या प्रत्येक दलाई लामांपैकी ते सर्वात महान दलाई लामा आहेत, असे लोबसांग म्हटले.
कोरोना विषाणूबाबत बोलताना ते म्हणाले, की ही गंभीर महामारी आहे. याबाबतचे जगभरातील तज्ज्ञ त्याकडे लक्ष देऊन आहेत, तेव्हा मी त्याबाबत अधिक काही बोलू शकत नाही. मात्र, लोकांनी आपापली काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच, लोकांनी या संकटाच्या काळात एकमेकांची मदत करणेही गरजेचे आहे.
दलाई लामांच्या वाढदिवसानिमित्त, आम्ही जगातील त्या प्रत्येक देश, संस्था आणि नागरिकांचे आभार मानू इच्छितो जे तिबेटच्या बाजूने उभे आहेत.
भारताने सध्या जवळपास एक लाख तिबेटी नागरिकांना आश्रय दिला असून, तिबेटचे सरकारही भारतातूनच कार्यरत आहे.
हेही वाचा : मध्य प्रदेशमध्ये उभारला जातोय आशियातील सर्वात मोठा सौरप्रकल्प