अहमदाबाद - अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तयार झालेले चक्रीवादळ 'वायू' आज रात्रीच्या सुमारास गुजरात किनाऱ्यावर धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्याचा प्रभावही गुजरातमध्ये जाणवत असून वादळी वाऱ्यांना सुरूवात झाली आहे. आज सायंकाळपर्यंत हे चक्रीवदळ गुजरातमध्ये धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गुजरातमध्ये जोरदार वादळी वाऱ्यांना सुरूवात झाली असून समुद्र खवळलेला आहे. चक्रीवादळ 'वायू' वेगाने गुजरातकडे जात आहे. याचा प्रभाव मुंबईत दिसून येत आहे. मुंबईत जोराच्या वाऱ्यामुळे झाड उन्मळून पडत आहेत. गुजरातचे मुख्य सचिव जे. एन. सिंह यांनी माहिती देताना सांगितले की, गुरुवारी सकाळच्या वेळी वेरावलजवळ चक्रीवादळ 'वायू' धडकण्याची शक्यता आहे. मात्र, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार हे वादळ आज रात्रीपर्यंतर केव्हाही गुजरात किनाऱ्यावर धडक देऊ शकते. त्यासाठी आपत्कालीन परिस्थितीनुसार सौराष्ट्रच्या किनाऱ्यावरील भागात एनडीआरएफ दलांना तैनात करण्यात आले आहे. एनडीआरएफ भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलासोबत समन्वय राखून काम करणार आहे. परिस्थितीबाबत लोकांना सार्वजनिक माध्यमे, एसएमएस आणि व्हॉटसअॅपद्वारे जागरुक केले जात आहे. हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, की यामुळे किनाऱ्यावरील भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. हा मान्सूनपूर्व पाऊस असणार आहे.