नवी दिल्ली - फनी चक्रीवादळ उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्यांवर ३० एप्रिलपर्यंत कोणत्याही क्षणी धडकण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात आग्नेयेकडे प्रचंड दाब निर्माण झाली असून याचे रूपांतर शनिवारी 'फनी' या चक्रीवादळात झाले आहे. त्याची तीव्रता आणखी वाढून त्याचे जोरदार चक्रीवादळ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याविषयी भारतीय हवामानशास्त्र विभागाने रविवारी पहाटे ३:०२ वाजता माहिती दिली.
'सध्या 'फनी' हिंदी महासागराच्या पूर्वेला पोहोचले असून ते आग्नेयेकडून बंगालच्या उपसागराकडे येत आहे. आमच्या आजच्या मूल्यांकनानुसार हे चक्रीवादळ आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूच्या किनाऱ्यांजळ येईल. मात्र, जमिनीकडे सरकेल किंवा नाही हे निश्चित नाही. ते तिथून मागेही फिरू शकते. आम्ही त्याच्या मार्गावर लक्ष ठेवून आहोत,' असे आयएमडीचे (India Meteorological Department) अतिरिक्त महासंचालक मृत्युंजय मोहापात्रा यांना दिल्लीमध्ये सांगितले. मोहापात्रा हे चक्रीवादळ इशारा विभागाचेही नेतृत्व करतात. चेन्नईतील या भागातील चक्रीवादळ इशारा केंद्राचे संचालक एस. बालाचंद्रन यांनी फनी २४ तासांत गंभीर स्वरूप धारण करेल, असे म्हटले आहे. बांग्लादेशने सुचवल्यानुसार याला फनी असे नाव देण्यात आले आहे, असे ते म्हणाले.
यामुळे २९ आणि ३० एप्रिलला केरळमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तर, तमिळनाडूची उत्तर किनारपट्टी आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीवर ३० एप्रिल आणि १ मे रोजी हलका ते मध्यम प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. २८ एप्रिलपासूनच श्रीलंका, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशाला लागून असलेला समुद्र खवळलेला राहील. मोठमोठ्या लाटा उसळतील, असा इशारा देण्यात आला आहे. या प्रदेशांसह पुदुच्चेरी येथील मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.