नवी दिल्ली- आता इ-वॉलेटमध्ये क्रेडिटकार्डद्वारे पैसे टाकल्यास २ टक्के शुल्क भरावे लागणार आहे. हा शुल्क पेटीएम कंपनीकडून घेण्यात येणार आहे. आधी इ-वॉलेटमध्ये एका महिन्यात १० हजार पेक्षा जास्त रक्कम जमा केल्यास हा शुल्क भरावा लागत होता. मात्र, आता कंपनीने या नियमात बदल केला आहे. त्यामुळे, ग्राहकांना आपला खिसा थोडा ढिला करावा लागणार आहे.
पेटीएम वॉलेटमध्ये क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरताना, २ टक्के नाममात्र शुल्क भरणे गरजेचे आहे. तुम्ही जेव्हा वॉलेटमध्ये पैसे जमा करता तेव्हा आम्ही तुमच्या बँक किंवा पेमेंट नेटवर्कला मोठे शुल्क देतो. कृपया कुठलेही शुल्क न देता वॉलेटमध्ये पैसे जमा करण्यासाठी यूपीआय किवा डेबिट कार्ड वापरा, असा संदेश क्रेडिट कार्डद्वारे वॉलेटमध्ये पैसे जमा करताना अॅपवर दिसून येतो. असे जरी असले तरी पेटीएमकडून या संबंधी एक ऑफरही देण्यात आली आहे. यात वॉलेटमध्ये क्रेडिट कार्डने कमीत कमी ५० रुपये टाकल्यास ग्राहकाला २०० रुपयांपर्यतचा २ टक्के कॅशबॅक मिळणार आहे.
दरम्यान, यासंबंधी चौकशी करण्यासाठी पेटीएमला संपर्क करण्यात आला. यावर यूपीआय, नेट बँकींग आणि कार्डसह ग्राहकांना त्यांच्या कोणत्याही प्राधान्यकृत निधी स्रोतांकडून पेटीएम वॉलेटमध्ये पैसे जमा करण्याची सोय आहे. या स्रोतांकडून पेटीएम वॉलेटमध्ये पैसे टाकल्यास संबंधित बँक आणि क्रेडिट कार्ड कंपन्या फी आकारतात. त्यामुळे, २ टक्के शुल्क आम्ही ग्राकांकडून घेत असल्याचे पेटीएम कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले.
त्याचबरोबर, वॉलेटमध्ये पैसे जमा करण्यासाठी इतर कंपन्यांकडून आकारला जाणार शुल्क आम्ही सहन करू. तसेच, वॉलेटमधून बँक अकाऊंटमध्ये पैसे जमा करताना ५ टक्के शुल्क आकारला जातो. मात्र, उत्सवाचा हंगाम असल्याने प्रोमोशनल ऑफर म्हणून आम्ही हा शुल्क तात्पुरता माफ केल्याचेही प्रवक्त्याने सांगितले.
हेही वाचा- केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले