नवी दिल्ली - केंद्रीय राखीव पोलीस दलातील 37 वर्षीय जवानाचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला आहे. जवान आधीपासून कर्करोगानेही ग्रस्त होता. आत्तापर्यंत सीआरपीएफ दलातील तीन जवानांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सर्व निमलष्करी दलातील 11 जवान दगावले आहेत.
कोरोनामुळे मृत्यू झालेला जवान 141 बटालियनमध्ये कार्यरत होता. शुक्रवारी दिल्लीतील रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. एप्रिल महिन्यापासून कर्करोगावरही उपचार सुरु होते. मात्र, नंतर कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला. 3 लाख 25 हजार जवान असलेल्या सीआरपीएफ दलात आत्तापर्यंत 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर सेंट्रल आर्मड पोलीस फोर्ससमधील 11 जवान कोरोनामुळे दगावले आहेत.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील 4 जवान कोरोनामुळे दगावले आहेत. तर सीमा सुरक्षा विभागातील 2, सशस्त्र सीमा दल आणि इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस दलातील प्रत्येकी एक जवान कोरोनामुळे दगावला आहे.
अद्ययावत आकडेवारीनुसार केंद्रीय पोलीस दलातील 1 हजार 550 जवानांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 1 हजार 100 जण पूर्णत बरे झाले आहेत. एकूण निमलष्करी दलामध्ये 10 लाखांपेक्षा जास्त जवान आहेत. अंतर्गत सुरक्षा व्यवस्था आणि देशाच्या सीमारेषेवर त्यांना तैनात करण्यात आले आहे. कोरोना काळात पोलिसांबरोबरही निमलष्करी दलातील जवान कार्यरत आहेत.