नवी दिल्ली : कोरोना लसीकरण हे अनिवार्य नसून, ऐच्छिक असल्याचे दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी रविवारी स्पष्ट केले. रविवार सकाळीपर्यंत दिल्लीतील ८१ लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी १०० जणांना या लसीचा पहिला डोस देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
दिल्लीकरांना मोफत लस..
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील नागरिकांना मोफत कोरोना लस देण्याची घोषणा केली आहे. हे लसीकरण अनिवार्य नसून ऐच्छिक असणार आहे. शनिवारीच दिवसभरात ८,१०० जणांना या लसीचा पहिला डोस देण्याचे आमचे लक्ष्य होते. मात्र, सायंकाळपर्यंत केवळ ५३ टक्के लोकांनाच लस देता आल्याचेही जैन यांनी सांगितले.
लसीकरण केंद्रांची संख्या वाढवणार..
दिल्लीमध्ये सध्या ८१ कोरोना लसीकरण केंद्रे आहेत. काही दिवसांमध्ये २१५ आणि मग कालांतराने १००० केंद्रांपर्यंत ही संख्या न्यायची योजना असल्याचे जैन यांनी सांगितले. महानगर प्रशासन कितपत वेगाने लसी पुरवते त्यावर हा वेग अवलंबून असल्याचे जैन यांनी स्पष्ट केले.
लस घेतल्यानंतर दिल्लीत काहींना जाणवला त्रास..
दिल्लीमध्ये लसीकरणाच्या पहिल्या दिवशी ४,३१७ लोकांना लस देण्यात आली. त्यानंतर, त्यांपैकी ५२ जणांना त्रास जाणवल्याचे समोर आले आहे. यातील ५१ जणांना किरकोळ त्रास उद्भवला तर एकाती प्रकृती गंभीर बनल्याचे सांगण्यात आले आहे. दिल्लीच्या आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली होती. या रुग्णाची प्रकृती आता स्थिर असल्याचे जैन यांनी सांगितले.
हेही वाचा : काँग्रेस-डाव्यांमध्ये कोणताही गैरसमज नाही; बंगाल विधानसभा निवडणूक एकत्रच लढवणार