हैदराबाद - कोरोनाचा अधिक संसर्ग टाळण्यासाठी मृतदेहाची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा नियम आहे. मात्र, तेलंगणाच्या निजामाबाद शहरात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणावर प्रकाश टाकणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. कोरोना रुग्णाचा मृतदेह ऑटोरिक्षातून नेण्यात आला आहे. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रिक्षामधील मागील सीटच्या तळाशी ठेवलेला मृतदेह रिक्षाच्या दोन्ही बाजूंनी बाहेर पडलेला दिसत आहे. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी आणि स्थानिक नगरपालिका कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक संरक्षण उपकरणे (पीपीई) किट घातली नव्हती, असे रिक्षा चालकाने सांगितले. ही घटना शुक्रवारी घडली परंतु शनिवारी घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
मृतदेह शहरातील शासकीय सामान्य रुग्णालयातून स्मशानभूमीत हलविण्यात येत होता. रूग्णालयात रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने मृतदेह रिक्षातून नेण्यात आला. दरम्यान या प्रकरणी निजामाबादचे जिल्हाधिकारी सी नारायण रेड्डी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
मृतांचे नातेवाईकांना रुग्णवाहिकेची प्रतीक्षा करण्यास सांगितले. मात्र, ते तयार नव्हते. त्यांनी स्वत:च्या ऑटोरिक्षात मृतदेह नेण्याची परवानगी द्यावी, असा आग्रह धरला होता. त्यावर रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी कंत्राटी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याद्वारे मृतदेह स्मशानभूमीकडे नेण्याची व्यवस्था केली, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
या घटनेची गंभीर दखल घेत वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. रमेश रेड्डी यांनी रुग्णालय अधीक्षकांना त्या कर्मचार्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले.