हैदराबाद- कोरोनासारख्या जागतिक महामारीवर मात करण्यासाठी भारताच्या लस उत्पादनाची मोठ्या प्रमाणात मदत होणार असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. रशियाने आयोजित केलेल्या 12 व्या ब्रिक्स शिखर परिषदेला संबोधित करताना मोदी बोलत होते. कोविडसारख्या संकटावर मात करण्यासाठी भारताची लस उत्पादन आणि वितरण क्षमता मानवतेच्या हितासाठीही कार्य करेल, तसेच कोविडनंतरच्या जागतिक अर्थव्यवस्थेसाठी भारत सक्षम देश ठरू शकेल, असेही प्रतिपादन मोदी यांनी केले. दरम्यान, भारतात कोरोना रूग्णांचा दर सातत्याने कमी होत असून जगातील इतर देशांच्या तुलनेत मृत्यूचा दरही कमी असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
नवी दिल्ली- कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्यास तसेच कोविड-19 च्या सुरक्षा निकषांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन झाल्यास बाजारपेठा बंद कराव्या लागतील, असे मत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केले. आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सरकार या संदर्भात प्रस्ताव केंद्राकडे पाठवेल, असेही ते म्हणाले. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारने दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांना विवाह सोहळ्यांमध्ये 200 लोक एकत्रित करण्यास परवानगी देण्याचा निर्णय मागे घेण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. तसेच ही संख्या आता 50 पर्यंत मर्यादित केली आहे. दिल्लीतील कोविड -19 च्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दिल्ली सरकार, केंद्र आणि इतर सर्व संस्था प्रयत्न करत असल्याचेही केजरीवाल म्हणाले.
लखनऊ - जागतिक आरोग्य संघटनेने उत्तर प्रदेश सरकारच्या कोरोना संबधित उपाययोजना तसेच धोरणाचे कौतुक केले आहे. तसेच इतर राज्यांनी त्याचे अनुकरण करावे, असे मत जागतिक आरोग्य संघटनेनेचे प्रतिनिधी रॉडेरिको ओफ्रिन यांनी व्यक्त केले. कोरोनाचा प्रार्दुभाव रोख्यण्यासाठी ७० हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांनी काम केल्याचेही ते म्हणाले.
गुरुग्राम - कोरोनाची वाढतील रूग्णसंख्या लक्षात घेता सर्वसाधारण प्रवर्गातील 50 टक्के बेड तसेच आयसीयू-व्हेंटिलेटर प्रकारातील 75 टक्के बेड आरक्षित करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहे. त्यामुळे सर्वसाधारण श्रेणी आणि आयसीयू-व्हेंटिलेटर बेडची संख्या अनुक्रमे 800 आणि 300 ने वाढण्याची अपेक्षा आहे. सद्यस्थितीत 21000 बेड गुरुग्रामच्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये राखीव आहेत, ज्यात आयसोलेशन बेडची संख्या 1,649 एवढी आहेत.
बेंगळुरू- आठ महिन्याच्या लॉकडाउननंतर कोरोना संदर्भातील सर्व खबरदारी घेत कर्नाटकमधील महाविद्यालये आजपासून पुन्हा सुरू झाले आहेत. परंतु अनेक विद्यार्थ्यांचे कोरोना चाचणी अहवाल आले नसल्याने त्यांना महाविद्यालयात जाता आले नाही. महाविद्यालयात उपस्थित राहण्याकरीता विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचार्यांना कोविड चाचणीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
हेही वाचा- माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांचा भाजपला रामराम, उमेदवारी डावलल्याने निर्णय