नवी दिल्ली - देशभरात कोरोनाचे बुधवारी नवीन 90,123 बाधित रुग्ण आढळून आले. कोरोनाबाधितांचा भारताने ५० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. आज 1,290 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून देशातील आत्तापर्यंतची कोरोनाबाधितांची संख्या 50,20,359 एवढी झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.
'डीसीजीआय'ने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला ऑक्सफर्ड 'सीओव्हीआयडी -१' लसीची क्लिनिकल चाचणी पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी नवीन भरती स्थगित करण्याचा पूर्वीचा आदेश रद्द करण्यात आला आहे. तथापि, स्क्रीनिंगच्या वेळी अतिरिक्त काळजी घेणे, माहितीच्या संमतीने अतिरिक्त माहिती प्रदान करणे आणि चाचणीच्या पाठपुरावादरम्यान होणाऱ्या प्रतिकूल घटनांवर बारकाईने नजर ठेवणे यासारख्या काही अटी डीसीजीआयने घातल्या आहेत.
दिल्ली -
गेल्या 24 तासात दिल्लीत 4473 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 3313 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आत्तापर्यंतचे एका दिवसात सापडलेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत. या रुग्णसंख्येबरोबरच दिल्लीतील एकणू कोरोनाबाधितांचा आकडा 2,30,269 वर जाऊन पोहचला आहे. यातील 1,94,516 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. दरम्यान, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी होऊन 84.47 टक्के झाले आहे. दिल्ली भाजप अध्यक्ष आदेश गुप्ता यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली.
झारखंड -
बुधवारी झारखंडमध्ये नवीन 1719 रुग्ण कोरोनाबाधित आढळले असून आठ जणांचा या विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना मृतांची संख्या आता 571 एवढी झाली असून एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 64,456 वर जाऊन पोहचला आहे. एकूण बाधित रुग्णांपैकी आत्तापर्यंत 49,750 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. दरम्यान, झारखंड सरकारच्या नव्या आदेशानुसार लोकांना खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणीसाठी आता 1500 रुपये द्यावे लागतील. यापूर्वी खासगी लॅबमधील कोरोना चाचणीचा दर 2400 रुपये होता.
उत्तर प्रदेश -
उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 24 तासात नवीन 6,337 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3,30,265 एवढी झाली आहे. 86 कोरोनाबाधित रुग्णांचा आज मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या 4,690 एवढी झाली आहे. राज्यात सध्या कोरोनाचे 67,002 अॅक्टीव रुग्ण आहेत तर 2,58,573 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 78.29 टक्के असा आहे.
कर्नाटक -
कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांचा कोरोना अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आला असून ते सध्या गृह अलगीकरणात असल्याचे सांगण्यात आले आहे. मंगळवारी बोम्मई यांच्याकडे घरकाम करणारा मुलगा पॉझिटिव्ह सापडल्यानंतर त्यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती, याचा अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आला आहे. बोम्मई यांनी ट्विट करून आपण पॉझिटिव्ह असल्याचे जाहीर केले. कोरोनाची काही लक्षणे दिसून येते आहेत, मात्र आपण बरे आहोत असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - राज्यात कोरोनाचा उद्रेक, आज २३ हजार ३६५ नव्या रुग्णांची नोंद
हेही वाचा - मुंबईत कोरोनाच्या नव्या 2352 रुग्णांची नोंद, 50 रुग्णांचा मृत्यू