हैद्राबाद - केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनामुक्त रुग्णांना उपचारादरम्यान आलेल्या समस्यांची माहिती संकलीत करायला सुरुवात केली आहे. ही माहिती मिळवण्यासाठी एनसीडीसी (नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल) दूरध्वनीवरुन रुग्णांशी संवाद साधून सर्वेक्षण करणार आहे. यासंदर्भात मंत्रलयाने आधीच प्रारूप तयार केलेले आहे. देशात आतापर्यंत तब्बल ३५ लाख ४२ हजार ६६३ रुग्ण बरे झाले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहिती नुसार रुग्ण बरे होण्याचे प्रमाणापैकी ६०% रुग्ण हे देशातील ५ राज्यातील आहेत. यात महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांचा समावेश आहे.
- देहराडून - राज्याच्या येणाऱ्या पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचे सावट पसरले आहे. २३ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या अधिवेशनाबाबत अनेक अनिश्चितता निर्माण झाल्या आहेत. राज्यातील अनेक आमदारांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.
- मागील दोन दिवसांपासून राज्यात दररोज १ हजार कोरोना रुग्णांची भर पडत आहे. राज्यातील अनेक मंत्र्यांसह आमदारांना कोरोनाची लागण झालेली आहे. दरम्यान, सत्ताधारी भाजपाने कोरोना संक्रमणाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊनचा प्रस्ताव ठेवलेला आहे.
- रायपूर - मागील काही दिवसांत राज्यात दररोज २ हजार ५०० पेक्षा जास्त रुग्णांची भर पडत आहे. याच पार्श्वभूमीवर बेमेतारा जिल्ह्यात १३ ते २० सप्टेंबर दरम्यान लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या काळात शासकीय आणि खासगी कार्यालये बंद राहणार आहेत.
- भुवनेश्वर - कोरोना रुग्णांच्या संख्येत देशातील पहिल्या दहा राज्यांमध्ये ओडीशा राज्याचा समावेश झालाा आहे. मागील ३ आठवड्यांपासून राज्यात दररोज ३ हजारापेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. तसेच रुग्णवाढीचा हा दर दररोज ३ टक्क्यांनी वाढत आहे. यामुळेच राज्य कोरोना रुग्णांच्या पहिल्या दहा राज्यांच्या यादीत आहे.
- रांची - कोरोना चाचणी करायला गेलेल्या एका गर्भवती महिलेच्या गळात तपासणी कीट फसली आहे. बोकारो येथील सदर रुग्णालयातील ही घटना आहे. घटनेची माहिती मिळताच मुख्य शल्य चिकित्सक डॉ. अशोक कुमार पाठक यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर महिलेच्या प्राथमिक तपासणी करुन चांगल्या उपचारासाठी धनबाद रुग्णालयात हलवण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत ५१२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.