हैदराबाद - मागील २४ तासांत देशात ६९ हजार ६५२ नवे कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर एकूण रुग्णांची संख्या २८ लाख ३६ हजार ९२५ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आत्तापर्यंत सुमारे २१ लाख रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात रुग्ण बरे होण्याचा दर ७३.९१ टक्के असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
देशभरात ६ लाख ८६ हजार ३९५ अॅक्टिव्ह रुग्ण असून यातील फक्त ०.२८ टक्के रुग्ण व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत. मृतांचा आकडा वाढून ५३ हजार ८६६ झाला आहे. कोरोना चाचण्या वाढत असताना त्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दावा आरोग्य मंत्रालयाने केला आहे. बुधवारी दिवसभरात विक्रमी ९ लाख १८ हजार ४७० चाचण्या करण्यात आल्या. पॉझिटिव्ह रुग्णांचा दर ८ टक्क्यांच्या खाली आल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
दिल्ली -
दिल्लीतील एक तृतीयांश लोकसंख्या कोरोनामुळे प्रभावित झाली असून त्यांच्यात प्रतिजैविके तयार झाल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. प्रशासनाने शहरातील परिस्थितीचा एक अहवाल तयार केला आहे. दिल्लीतील ५८ लाख जनतेत प्रतिजैवक तयार झाले असल्याचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले.
बिहार -
गुरुवारी बिहार सरकारने खासगी रुग्णालयातील कोरोना उपचाराच्या शुल्कावर नियंत्रण आणले. राज्यातील विविध भागातील खासगी रुग्णालयात उपचाराचे दर राज्य सरकारने जाहीर केले आहेत. त्यानुसार रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत.
'अ' गटातील शहरांमध्ये पाटण्याचा समावेश आहे. येथे कोरोना उपचारासाठी वेगळे दर आहेत. तर 'ब' गटात भागलपूर, मुझ्फरापूर, गया, पुर्णिया, दरभंगा या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर 'क' गटातही काही जिल्ह्याचा समावेश आहे. या वर्गवारीनुसार राज्यातील रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत.
'अ' गटातील रुग्णालयात कोरोना रुग्णावर आयसीयू आणि व्हेंटिलेटरचा खर्च १८ हजारांपेक्षा जास्त प्रतिदीन नसावा. त्यात पीपीई किटचाही समावेश आहे. तर 'ब' गटातील जिल्ह्यातील रुग्णालयात एका दिवसाचा उपचाराचा खर्च १४ हजार ४०० रुपयांच्या पुढे जाता कामा नये. 'सी' गटातील भागात एका दिवसाचा हाच खर्च १० हजार ८०० च्या पुढे जाता कामा नये, असा निर्णय राज्य प्रशासनाने घेतला आहे.
राजस्थान -
राजस्थानात गुरुवारी ६९० नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले. तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण रुग्णांची संख्या ६५ हजार ९७९ झाली असून ९१५ जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत राज्यात ५० हजार ३९३ रुग्ण बरे झाले असून १४ हजार ६७१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मागील तीन दिवसांत राज्यातील २२ कैद्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
हिमाचल प्रदेश -
कोरोनासंबंधी राज्य सरकारने सराकारी आणि खासगी रुग्णालयांच्या तपासणी, निगराणी आणि मार्गदर्शनासाठी गठीत केलेल्या समितीतील सदस्यांची माहिती सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या सुचनेनुसार उच्च न्यायालयाने माहिती मागितली आहे.
महाराष्ट्र -
राज्यात मागील २४ तासात सर्वोच्च १४ हजार ४९२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आज ३२६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे मागील २४ तासात राज्यात १२ हजार २४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.३७ टक्के एवढे झाले आहे. तर सध्या राज्याचा मृत्यू दर ३.३२ टक्के एवढा आहे.
झारखंड -
झारखंडमध्ये मागील २४ तासांत ९६७ नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले. तर ९ जणांचा मृत्यू झाला. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या २६ हजार ३०० झाली असून त्यातील १६ हजार ५६६ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. आत्तापर्यंत राज्यात ९ हजार ४५६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
ओडिशा -
ओडिशा राज्यात मागील २४ तासांत २ हजार ८९८ रुग्ण आढळून आले आहेत. आता राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ७० हजार झाली आहे. गुरुवारी आणखी ८ रुग्णांचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत ३८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २२ हजार ६५१ आहे. मागील २४ तासांत राज्यात सुमारे ५४ हजार चाचण्या घेण्यात आल्या.
उत्तराखंड -
उत्तराखंड राज्यात आत्तापर्यंत १८७ रुग्णांचा कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. तर एकूण रुग्णांचा आकडा १३ हजार ६३६ झाला आहे. गुरुवारी ३०१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या ३ हजार ९६६ जण राज्यातील विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.