हैदराबाद - देशात आणि जगभरात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. जगभरातील संशोधक, वैज्ञानिक, विद्यापीठे, फार्मा कंपन्या कोरोनावर लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक लसी मानवी चाचणीच्या टप्प्यात आहेत. दरम्यान, कमकूवत प्रतिकारक्षमता असलेल्या व्यक्तींना कोरोनाचा जास्त धोका असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी बुधवारी म्हटले. प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी योग्य आणि सुरक्षित अन्नाचे सेवन केले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.
देशभरात कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा २७ लाख ६७ हजार २७३ झाला आहे. ६ लाख ७६ हजार ५१४ अॅक्टिव्ह रुग्ण देशभरात आहेत. दिलासादायक बाब म्हणजे २० लाखांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आत्तापर्यंत ५२ हजार ८८९ रुग्ण दगावले आहेत. मागील २४ तासांत देशात ६४ हजार ५३१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. मागील एका आठवड्यात देशात ४ लाख ३१ हजार ९८३ रुग्ण आढळून आले आहेत.
दिल्ली
अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी नुकतेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उप राज्यपाल नजीब जंग यांची बैठक झाली. त्यामध्ये हॉटेल आणि बाजार खुले करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दिल्ली आपत्ती निवारण समितीने हा निर्णय घेतला.
कोरोना संसर्ग होऊन गेल्यावरही एखाद्या व्यक्तीत पुन्हा लक्षणे आढळून येतात का? याचे विश्लेषण आणि अभ्यास करण्यासाठी दिल्ली सरकारने राजीव गांधी सुपर स्पेशालिटी सरकारी रुग्णालय तयार केले आहे. आज(गुरुवार) केजरीवाल या रुग्णालयाचे उद्धाटन करणार आहेत.
कर्नाटक
कर्नाटक राज्याने ५ महिन्यांपेक्षाही कमी काळात २० लाख कोरोनाच्या चाचण्या घेतल्या आहेत. देशात सर्वात जास्त चाचण्या घेणाऱ्या राज्यात कर्नाटकचा समावेश झाला आहे.
झारखंड
झारखंडचे आरोग्य मंत्री बन्ना गुप्ता यांना कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवारी त्यांनी याबाबत माहिती दिली. संपर्कात आलेल्यांनी चाचणी करण्याचे आणि सुरक्षित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
ओडिशा
कोरोनाचा संसर्ग असून लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांना भूवनेश्वर महानगर पालिकेने 'पे अॅन्ड युझ' तत्त्वावर ओयो(OYO) हॉटेल्स खुली करून दिली आहे. रुग्णांना अलगीकरणात ठेवण्यासाठी या हॉटेल्सचा वापर करण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी रुग्णांना पैसे भरावे लागणार आहेत. कंपनीशी चर्चा केल्यानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला.
महाराष्ट्र
'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत राज्य सरकारने जिल्हा अंतर्गत प्रवास खुले केले असले तरी कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. बुधवारी तब्बल 13 हजार 165 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून, ३४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात बुधवारी ९ हजार ११ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.०९ टक्के आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ४ लाख ४६ हजार ८८१ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ६० हजार ४१३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.