हैदराबाद - आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात मागील 24 तासात 22 हजार 771 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 442 जणांचा मृत्यू झाला. या नव्या रुग्णांसह देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 6 लाख 48 हजार 315 इतका झाला आहे. यात 2 लाख 35 हजार 433 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 3 लाख 94 हजार 226 जणांनी कोरोनाला मात दिली आहे. 18 हजार 665 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
- दिल्ली -
दिल्लीत शुक्रवारी 2 हजार 505 नवे रुग्ण आढळले. या वाढीव रुग्णांसह दिल्लीतील कोरोना रुग्णांचा आकडा 97 हजारावर पोहोचला आहे. तर 3 हजार 4 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मागील 24 तासात दिल्लीत 55 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती दिल्ली आरोग्य विभागाने दिली.
- महाराष्ट्र -
पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री सल्लागार अजोय मेहता, आरोग्य सचिव प्रदीप व्यास आणि इतर अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या आढावा बैठकीला मोहोळ उपस्थित होते. दरम्यान, राज्यात आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासह पोलिसाच्या मृत्यूची संख्या 64 इतकी झाली आहे. तर 1 हजार 40 पोलिसांवर उपचार सुरू आहेत.
- बिहार -
बिहार विधान परिषदेचे अध्यक्ष अवधेश नारायण सिंह यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर बिहार मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी कोरोना चाचणी केली. यात नितिश कुमार यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
- राजस्थान -
राज्य सरकार शालेय पाठ्यक्रमात कोरोनाचा समावेश करु इच्छित आहे. राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. रघु शर्मा यांच्या मते, यामुळे कोरोनाचा संपर्क रोखण्यासाठी आणि जनजागृती करता येईल. यासाठी पहिली ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एक अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे.
- उत्तर प्रदेश -
राज्याचे आयुष मंत्री धर्म सिंह सैनी यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे त्यांच्या परिवरातील लोकांना सेल्फ क्वारंटाईन होण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय सैनी यांच्या नातेवाईकांची चाचणी घेण्यात येणार आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये मृत्यूचा आकडा 773 इतका झाला आहे. मागील 24 तासात उत्तर प्रदेशमध्ये 24 जणांचा मृत्यू झाला. तर 757 नवे रुग्ण आढळले. या नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्ताची संख्या 26 हजार 554 झाली आहे.
- उत्तराखंड -
राज्यात कोरोना बरा होण्याचे प्रमाण 81 टक्क्यावर पोहोचले आहे. एका अहवालानुसार, रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी 57.39 दिवस झाला आहे. देशात दुप्पट होण्याचा दर 23.52 दिवस इतका आहे. दुसरीकडे मागील आठवड्यापासून कोरोना रुग्ण वाढण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
- झारखंड -
झारखंडमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. यासह कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 18 वर पोहोचली आहे. राज्यात एकूण 2 हजार 700 रुग्ण आढळून आले. यात 2 हजार 1 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, आजघडीपर्यंत राज्यात 1 लाख 51 हजार 699 जणांची चाचणी करण्यात आली आहे.
- ओडिशा -
ओडिशामध्ये शनिवारी कोरोनामुळे 5 जणांचा मृत्यू झाला. या संख्येसह मृत्यूचा आकडा 34 इतका झाला आहे. 495 नवे रुग्ण आढळले असून यासह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 8 हजार 601 वर पोहोचला आहे. ही माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत असलेल्या गंजम जिल्ह्यात 34 पैकी 20 जणांचा मृत्यू झाला आहे.
- मध्य प्रदेश -
इंदूर आणि भोपाळ नंतर मुरैना जिल्हा कोरोनाचा हॉटस्पाट ठरत आहे. मुरैना जिल्ह्यात 78 नवे रुग्ण आढळून आले. या संख्येसह राज्यातील कोरोनाग्रस्ताची संख्या 14 हजार 606 वर पोहोचली आहे. यात 598 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.