हैदराबाद - कोरोना विषाणूने जगात थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत आहे. देशभरात बुधवारी 15 हजार 968 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर 465 रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे देशभरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 लाख 56 हजार 183 वर पोहोचली आहे. केंद्रिय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 14 हजार 476 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
- दिल्ली -
आगामी काळात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिल्लीतील प्रत्येक घरातील व्यक्तीची 6 जुलैपर्यंत स्क्रिनिंग करण्यात येईल. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने आपल्या योजनेत बदल केल्याचे सांगितले.
कोरोनावर मात करण्यासाठी 'दिल्ली कोरोना प्रतिसाद योजना' (Delhi COVID Response Plan) यात सर्व कंटेनमेन झोनचा आढावा घेतला जाईल. तसेच 26 जूनपर्यंत पुन्हा नव्याने आखणी केली जाईल आणि या झोन्समधील सर्व घरांचे स्क्रिनिंग 30 जूनपर्यंत करण्यात येईल. तर या नव्या कोरोना प्रतिसाद योजनेत दिल्लीतील उरलेल्यांची स्क्रिनिंग 6 जुलैपर्यंत करण्यात येईल.
दिल्लीतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 66 हजार 602 झाली आहे. ते एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येबाबतीत महाराष्ट्रानंतर दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहे.
- महाराष्ट्र -
बृहन्मुंबई महानगरपालिकाने (बीएमसी) ने मुंबईतील प्रत्येक नागरिकाची चाचणी घेण्याच्या उद्देशाने आपले युनिव्हर्सल टेस्टिंग मिशन सुरू केले. या मिशन अंतर्गत अँटीजेन टेस्टिंगच्या एक लाख कीट खरेदी करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. ते राज्यातील महापालिकेच्या आणि राज्यशासन रुग्णालयात उपलब्ध होणार आहे. या उपक्रमामुळे प्रयोगशाळांना ई-वर्गणीच्या आधारे रूग्णांची चाचणी घेता येणार आहे. यामुळे रुग्णाला बाहेर न जाता घरीच चाचणी करता येणार आहे.
- कर्नाटक -
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागानुसार, राज्यातील 19 विद्यार्थी गुरूवारपासून सुरु होणारी माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला (एसएसएलसी) परीक्षेला मुकणार आहेत. यातील 10 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 9 विद्यार्थी विलगीकरणात आहे. यामुळे त्यांना परिक्षेला हजर राहता येणार नाही. शिक्षण विभागाने, कंटेनमेंट झोनमधील विद्यार्थ्यांनी परिक्षेसाठी परवानगी दिली आहे. तसेच त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि तज्ञ यासह अनेकांनी परिक्षा रद्द करावी किंवा पुढे ढकलावी, अशी दबाव आणला होता. मात्र, सरकारने दबावाला बळी न पडता परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला.
- मध्यमप्रदेश -
कोरोनावर मात करण्यासाठी मध्यप्रदेश सरकार 1 जुलै ते 15 जुलै दरम्यान, 'किल कोरोना अभियान' चालवणार आहे.
या अभियानामध्ये सरकार कोविड मित्राची नियुक्ती करणार आहे. जो कंटेनमेंट झोनवर लक्ष ठेवेले आणि सर्व अहवाल सार्थक अॅपवर सादर करेल. यासाठी कोविड मित्राला 1500 रुपये देण्यात येणार आहेत.
जास्तीत जास्त 10 हजार टीम यासाठी तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक टीम प्रत्येक दिवशी 100 घरांचे सर्वेक्षण करणार आहे, अशी माहिती गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिली.
- बिहार -
बिहारच्या मुझफ्फरपुर न्यायालयात योग गुरू बाबा रामदेव आणि पतंजली आयुर्वेदचे एमडी आचार्य बालकृष्ण यांच्याविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे. कोरोनावर मात करण्यासाठीची औषधी बनवण्याचा दावा करुन त्यांनी लाखो लोकांची दिशाभूल केली आहे, असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.
त्यांच्यावर फसवणूक, गुन्हेगारी कारस्थान आणि इतर आरोपांबाबत एफआयआर नोंदविण्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या तमन्ना हाश्मी यांनी ही तक्रार दाखल केली आहे. याबाबत पुढील सुनावणी 30 जूनला होणार आहे.
- ओडिशा -
आरोग्य आणि परिवार कल्याण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत 135 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यासोबत राज्यातील कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या 4 हजाराच्यावर पोहोचली आहे. आतापर्यंत राज्यातील 4 हजार 123 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
त्याआधी 282 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5 हजार 752 वर पोहोचली आहे.
दरम्यान, गंजम जिल्ह्यातील सरकारी कार्यालये बुधवारीपासून पुढील 10 दिवस प्रत्येकासाठी बंद राहणार आहेत. जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना झालेली कोरोनाची लागण, या पार्श्वभूमीवर गंजम जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
- हिमाचल प्रदेश -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यांपासून शाळा बंद असल्यामुळे शिक्षक सुटीवर आहेत. शिक्षकांना 1 जुलैपासून शाळेत रुजू होण्यास सांगितले जाऊ शकते. केंद्रिय गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करत शाळा सुरू होऊ शकतात.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 30 जूनपर्यंत शाळांच्या सुट्या वाढवल्या होत्या. मात्र, कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने राज्य सरकार सावधगिरी बाळगून आहेत.
शिक्षण विभागाने शैक्षणिक कामे पुन्हा सुरू करण्याबाबत शासनाला सादर केलेल्या प्रस्तावानुसार शिक्षकांना ड्युटीमध्ये जाण्यास सांगितले जाईल.
- उत्तराखंड -
पंतजलीने कोरोनावर मात करण्यासाठी कोरोनील या औषधीची निर्मिती केली आहे. तसेच त्यांनी याबाबत दावाही केला आहे. मात्र, पंतजलीने फक्त सर्दी, खोकला आणि रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठीच्या औषधीसाठी अर्ज केला होता, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने योग गुरु रामदेव बाबांच्या पतंजलीला नोटीस दिली आहे.
पंतजली संस्थेला कोरोना विषाणूवर मात करणाऱ्या कोरोना कीट लॉन्च करण्याची परवानगी कुठून मिळाली, याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे, याबाबत ही नोटीस देण्यात आली आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या आयुर्वेद परवाना विभागाचे अधिकारी वाय. एस. रावत यांनी दिली.
दरम्यान, राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 568 वर पोहोचली आहे.
- झारखंड -
केंद्र सरकारच्या वंदे भारत मिशन अंतर्गत राज्यातील 14 विद्यार्थांना बुधवारी युक्रेनहून झारखंड राज्यातील हजारीबाग येथे आणण्यात आले आहे. ते विद्यार्थी युक्रेन येथे वैद्यकीय शिक्षण घेत होते. ते म्हणाले, दिल्ली येईपर्यंत आम्हांला कोणतीच समस्या जाणवली नाही.
युक्रेनमधील भारतीय दुतावासाने आम्हांला खूप मदत केली. मात्र, हजारीबाग येथे पोहोचल्यानंतर अनेक समस्या जाणवल्या. याठिकाणी अन्नाची आणि इतरही बाबींसाठी कोणतीच व्यवस्था करण्यात आली नव्हती. सध्या या विद्यार्थ्यांना एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांचा क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर त्यांना त्यांच्या घरी सोडण्यात येणार आहे.