हैदराबाद - कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत आहे. देशभरात रविवारी एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 4,10,461 वर पोहोचला असून मृत्यूचा आकडा 13,254 झाला आहे. तर आतापर्यंत 2,27,755 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
मुंबई
राज्यभरात कोरोना व्हायरसचा झपाट्याने प्रसार वाढत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिवसागणिक नव्याने रुग्ण वाढत आहेत. त्यातच रविवारी ३८७० नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. तर १७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ६० हजार १४७ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. तर १५९१ रुग्णांनी रविवारी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आजपर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या ७ लाख ७३ हजार ८६५ नमुन्यांपैकी १ लाख ३२ हजार ७५ नमुने पॉझिटिव्ह (१७.६ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ६६ हजार ७१९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २६ हजार २८७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १७० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद रविवारी झाली आहे. त्यापैकी ६९ मृत्यू हे मागील कालावधीतील आहेत.
उर्वरित १०१ मृत्यूंपैकी आरोग्यमंडळ निहाय मृत्यू- ठाणे-७० (मुंबई ४१, ठाणे मनपा २९), नाशिक-८ (नाशिक ७, अहमदनगर १), पुणे-१४ (पुणे १४), औरंगाबाद-१ (औरंगाबाद १), लातूर-१ (लातूर १), अकोला-७ (अकोला ४, अमरावती १, बुलडाणा १, वाशिम १). कोरोनामुळे मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ६१७० झाली आहे.
ओडिशा
ओडिशामध्ये रविवारी 304 नवे रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंतच एका दिवसातील रुग्ण वाढीचा हा उच्चतम आकडा आहे. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता 5,160 वर पोहोचला आहे. तर गेल्या 24 तासात 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 2,24,402 चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
304 रुग्णापैकी 272 रुग्ण हे क्वारंटाईन सेंटरमधील आहेत. तर उर्वरित 32 रुग्ण लोकल आहेत. पश्चिम बंगालमध्ये अम्फान चक्रीवादळच्या पार्श्वभूमीवर कर्तव्यावर गेलेल्या अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या 42 जणांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
दिल्ली
दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर प्लाझ्मा थेरपी करण्यात आली आहे. आता त्यांची आरोग्य स्थिती सुधारत असल्याची माहिती दिल्लीच्या आरोग्यमंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
जैन यांचा ताप कमी झाला आहे. ऑक्सिजनची पातळीही सुधारली आहे. सोमवारी त्यांना जनरल वॉर्डात हलविण्यात येईल. दरम्यान, शुक्रवारी राजीव गांधी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात जैन यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू असताना, त्यांना निमोनिया झाल्याने यांची प्रकृती खालावली होती.
दिल्लीत रविवारी 3,000 कोरोनाबाधितांची नव्याने नोंद झाली आहे. यासह दिल्लीतील कोरोनाबाधितांचा आकडा 60,000 वर पोहोचला आहे. तर 2,175 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारपर्यंत सलग तीन दिवस दिल्लीने 3 हजारांचा आकडा गाठला आहे. तर शनिवारी आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा 3,630 होता.
उत्तराखंड
उत्तराखंडमध्ये रविवारी कोरोना व्हायरसचे नवे 23 रुग्ण पाॅझिटिव्ह आढळले आहेत. यासह राज्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 2324 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 1486 रुग्ण बरे झाले असल्याची माहिती, राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.
दरम्यान, राज्यातील वाढता आकडा पाहता राज्य सरकारने राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये कोविड केअर सेंटर उभारण्यास सुरुवात केली आहे.