हैदराबाद- कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत आहे. देशभरात शुक्रवारी एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 3,80,532 वर पोहोचला असून मृत्यूचा आकडा 12,573 झाला आहे. तर 2,047,10 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
दिल्ली
कोरोची लागण झाल्यानंतर सध्या उपचार घेत असलेले दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्यंदर जैन यांना निमोनियाही झाला आहे. शुक्रवारी दुपारी त्यांची प्रकृती बिघडू लागल्याने त्यांना दुसर्या कोविड सेंटरमधील आयसीयूमध्ये हलविण्यात आले आहे.
कोरोनाबाधित एका 55 वर्षीय मंत्र्याला आता ऑक्सिजनच्या आधारावर ठेवण्यात आले आहे. त्यांना साकेतच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. तिथे त्यांच्या फुफ्फुसातील संसर्ग वाढल्यानंतर त्यांच्यावर प्लाझ्मा थेरपी केली जाईल, असे डाॅक्टरांनी सांगितले.
महाराष्ट्र
भाजप नेते राम कदम यांनी कोरोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कदम यांचा घाटकोपरमधील दहीहंडी उत्सव शहरातील सर्वात मोठा उत्सव असतो. कदम यांच्या दहीहंडी कार्यक्रमात बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामांकित कलाकार हजेरी लावतात.
कर्नाटक
मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्या बेंगळुरू येथील घरातील कार्यालयात एका कर्मचाऱ्याच्या नातेवाईकाला कोरोनाची लागण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी एका दिवसासाठी हे कार्यालय बंद ठेवण्यात आले होते.
राजस्थान
बारमेरमधून सुट्टीनंतर परत आलेल्या 12 बीएसएफ जवानांची शुक्रवारी कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. कस्तुरबा गांधी वसतिगृहातात या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. अनलाॅक 1 दरम्यान अनेक जवान सुट्ट्या घेऊन आपल्या घरी गेले होते. मात्र, सुट्टीनंतर परत आलेल्यांमधील काही जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
गुजरात
जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी, गुजरात सरकारने डिजिटल पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये राज्यातील जनतेने त्यांच्या आवडत्या योगासनाचे फोटो #DoYogaBeatCorona या हॅशटॅगचा वापर करुन शोशल मिडियावर अपलोड करायची आहेत.
उत्तराखंड
उत्तराखंडमध्ये शुक्रवारी 25 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यासह राज्यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा 2,127 वर पोहोचला आहे. कोरोनाबाधित आढळलेले रुग्ण महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा, यासारख्या कोरोना हाॅट्सपाॅट असलेल्या राज्यातून परतले आहेत.
झारखंड
झारखंडमध्ये कोरोनाचे शुक्रवारी आणखी तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यासह राज्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1922 वर पोहोचला आहे. शुक्रवारी आढळलेले रुग्ण रांचीच्या वेगवेगळ्या भागातील आहेत. राज्यात मृतांचा आकडा 11 वर पोहोचला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.