नवी दिल्ली - जगभरात COVID-19 ने थैमान घातले आहे. कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या या आजाराची सुरुवात चीनच्या वुहान प्रांतातून झाली. देशात आतापर्यंत याच्यामुळे 32 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, आतापर्यंत 1 हजार 251 बाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये 1 हजार 117 सध्या बाधित असलेल्या तर, 102 बरे होऊन रुग्णालयातून घरी सोडलेल्या रुग्णांचा समावेश आहे. मागील काही तासांत 227 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले होते. काही तासांत झालेली ही आतापर्यंतची सर्वाधिक वाढ आहे.
सध्या राजस्थानात 79, गुजरातमध्ये 71, कर्नाटकात 91, राजधानी दिल्लीमध्ये 97, काश्मीरमध्ये 48, उत्तर प्रदेशात 96, पंजाबमध्ये 38, महाराष्ट्रात 220, केरळात 213 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत देशभरात 38 हजार 442 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे.
देशात सध्या होत असलेला कोरोना-संसर्ग स्थानिक किंवा वैयक्तिक संक्रमणाच्या (लोकल ट्रान्समिशन) स्वरूपात असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. तसेच, हा फैलाव समूह-संक्रमणाच्या (कम्युनिटी ट्रान्समिशन) स्थितीत गेल्यास विभागाकडून तसे जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.