नवी दिल्ली - मागील 24 तासांमध्ये तब्बल 50,357 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 577 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 84,62,080 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.
देशातील रुग्णांचा आढावा
देशभरातील एकूण कोरोना रुग्णांपैकी 5 लाख 16 हजार 632 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, 78,19,886 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंतची मृतांची संख्या 1,25,562 झाली आहे. देशात रुग्ण बरे होण्याचा दर 92.41 टक्के आहे तर, मृत्यूदर 1.48 टक्के आहे. आयसीएमआरने शुक्रवारी एका दिवशी 11,13,209 चाचण्या केल्या आहेत. आत्तापर्यंत झालेल्या चाचण्यांचा आकडा 11,65,42,304 इतका आहे. आयसीएमआरच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
हेही वाचा - ....म्हणून लागतोय अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निकालाला उशीर
राज्यांमधील रुग्णांचा आढावा
महाराष्ट्रात सर्वाधिक 17,10,314 रुग्णसंख्या आहे. तर 44,965 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राखालोखाल आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि दिल्ली असा क्रमांक लागतो. राजधानी दिल्लीमध्ये शुक्रवारी नवीन रुग्णांची सर्वाधिक संख्या पाहायला मिळाली. दिल्लीमध्ये 4,28,831 रुग्णसंख्या असून शुक्रवारी नव्याने 7,178 रुग्णांची भर पडली. दिल्लीमध्ये गेल्या चार दिवसांपासून दररोज नव्या रुग्णांची संख्या 6000 पेक्षा जास्त आहे. बुधवारी देखील 6,842 रुग्ण आढळले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोनाची तिसरी लाट असल्याचे सांगितले आहे.
हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या माहितीनुसार जगातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 49 दशलक्ष इतका आहे तर 12,41,360 इतका मृतांचा आकडा आहे.
हेही वाचा - पोलिसांच्या “फोर्स वन”ला पुर्वीप्रमाणेच प्रोत्साहन भत्ता मिळणार