नवी दिल्ली - भारतातील कोरोनाच्या रुग्णांनी चार हजारांचा टप्पा गाठला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाचे ४,०६७ रुग्ण आढळून आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.
गेल्या १२ तासांमध्ये देशात कोरोनाचे ४९० नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या ४,०६७ वर पोहोचली आहे. यामध्ये ३,६६६ रुग्ण 'अॅक्टिव' आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. यासोबतच, भारतातील एकूण बळींच्या संख्येनेही शंभरी पार केली आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे १०९ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत सुमारे २९१ लोकांवरील उपचार यशस्वी झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.
देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात (७४८) आढळून आले आहेत. त्यापाठोपाठ तामिळानाडू (५७१) आणि दिल्लीचा (५०३) क्रमांक लागतो. तर सर्वाधिक बळीदेखील महाराष्ट्रातच (४५) गेले आहेत. त्यापाठोपाठ गुजरात (११) आणि मध्य प्रदेशचा (९) क्रमांक लागतो.
हेही वाचा : 'सोशल डिस्टन्सिंग पाळा, नाही तर कारवाईला सामोरे जा'