नवी दिल्ली - कोरोना महामारीचे रुपांतर सशक्त आणि स्वावलंबी भारतामध्ये करायचे आहे. देशाच्या प्रत्येक नागरिकाने कोरोना संकटाला संधीमध्ये बदलायचे आहे. सध्याचा काळ देशासाठी टर्निंग पॉईंट ठरू शकतो. त्यानुसार प्रयत्न करायला हवेत. यासाठी आत्मनिर्भर भारताची घोषणा करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स'च्या 95 व्या वार्षिक कार्यक्रमामध्ये आपले विचार मांडले.
पंतप्रधान म्हणाले, आत्मनिर्भर भारत करण्याचे पहिले पाऊल म्हणजे स्वदेशी वस्तूंचा वापर करणे. देशाच्या उत्पादनाला महत्त्व देणे. त्यासंबधी जनजागृती करणे. मोदींनी आपल्या भाषणामध्ये इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या भूमिकेबद्दल आपले मत मांडले. आयसीसीने पूर्व आणि ईशान्य भारतातील उत्पादन क्षेत्रासाठी फार मोठी मदत केली आहे. 1925 ला स्थापन झालेल्या आयसीसीने मोठी प्रगती केली. तसेच देशाच्या विकासातही योगदान दिले आहे.
बांबू आणि इतर सेंद्रीय उत्पादनांमुळे ईशान्य भारत हे सेंद्रीय शेतीचे प्रमुख केंद्र बनत आहे. अशा प्रकारच्या शेतीला आणि उत्पादनांना ग्राहकांनी पसंती दर्शवणे गरजेचे आहे. जेणेकरून आत्मनिर्भर भारताकडे देशाची वाटचाल होईल.