हैदराबाद – कोरोना महामारीच्या काळात हिंसा प्रतिबंधक आणि मदतीच्या सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळित झाल्या आहेत. त्यामुळे लहान मुलांना हिंसा व अत्याचार यांचा धोका वाढल्याचे युनिसेफने केलेल्या जागतिक सर्वेक्षणातून दिसून आले आहे.
कोरोनाचा सामाजिक-आर्थिक काय परिणाम झाला, हे जाणून घेण्यासाठी युनिसेफने 136 देशांमध्ये सर्वेक्षण केले. त्यामधील 104 देशांनी लहान मुलांवरील हिंसा रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक सेवा विस्कळित झाल्याचे म्हटले आहे. तर दोन तृतीयांश देशांनी किमान एका सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिका, मलेशिया, नायजेरिया आणि पाकिस्तानचा समावेश आहे. दक्षिण आशिया, पूर्व युरोप आणि केंद्रीय आशियामध्ये लहान मुलांच्या संरक्षणासाठी असलेल्या सेवा सर्वाधिक विस्कळित झाल्या आहेत.
युनिसेफच्या कार्यकारी संचालक हेनरीटा फोर म्हणाल्या, की आम्ही नुकतेच सुरुवात केली आहे. मात्र, कोरोनातील टाळेबंदीने लहान मुलांचे किती नुकसान झाले, याची अद्याप पूर्ण माहिती मिळालेली नाही. शाळा बंद असताना घराबाहेर पडण्यावर मुलांना निर्बंध आले आहेत. त्यामुळे घरातील मुलांवर ताणतणाव वाढत आहेत. अशातच मुलांचे संरक्षण करणाऱ्या सेवा आणि सामाजिक कार्यकर्ते नसल्याने मुलांना मदत मिळण्यासाठी ठिकाण राहिले नाही. पश्चिम आफ्रिकेत इबोला या संसर्गजन्य रोगाचा उद्रेक झाला होता. तेव्हादेखील मुलांच्या कल्याणाची व्यवस्था आणि सामाजिक यंत्रणा कमकुवत झाली होती. कोरोनाच्या महामारीतही तशीच परिस्थिती उद्भवल्याचे युनिसेफने म्हटले आहे.
अशा परिस्थितीत युनिसेफकडून सामाजिक कार्यकर्ते व मुलांचे संरक्षण करणाऱ्या सेवांना मदत करण्यात येत आहे. उदाहरणार्थ युनिसेफकडून बांग्लादेशमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांना सॅनिटायझर, मास्क, डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी गॉगल अशा वस्तू देण्यात आल्या आहेत. या सामाजिक कार्यकर्त्यांकडून रस्ते, झोपडपट्टी अशा ठिकाणी राहणाऱ्या मुलांना मदत करम्यात येते. तसेच नॅशनल चाईल्ड हेल्पलाईन 1098 साठी सामाजिक कार्यकर्त्यांना नोकरीत घेणे आणि प्रशिक्षण करणे यासाठी युनिसेफकडून मदत करण्यात येते.