नवी दिल्ली - उन्नाव बलात्कार प्रकरणी तीस हजारी न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे. पीडितेवर अत्याचार झाला, त्या दिवशी आरोपी आमदार कुलदिप सेनगर यांचा ठावठिकाणा काय होता, याबाबतची माहिती न्यायालयाने ते वापरत असलेल्या 'अॅपल' मोबाईल कंपनीकडे मागितली आहे. २८ सप्टेंबरपर्यंत सेनेगर यांच्या लोकेशन संबधीचा अहवाल न्यायालयाने मागितला आहे.
उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेचा अपघात झाल्यानंतर न्यायालयाने कुटुंबीयांची दिल्लीमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. उत्तरप्रदेशात जीवाला धोका असल्याचे म्हणत दिल्लीत राहण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली होती. अपघातानंतर दिल्लीतील एम्स रुग्णालयातून पीडितेला सोडण्यात आले आहे. मात्र, ८ दिवस रुग्णालयाच्या वसतिगृहात राहण्याची परवानगी दिली आहे.
सीबीआयला १५ दिवसांची अधिक मुदत
२५ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सीबीआयला तपासासाठी १५ दिवसांची मुदत वाढवून दिली आहे. पीडितेच्या वकिलांची साक्ष अजून नोंदवून घेण्यात आली नाही, असे सीबीआयच्या तपास पथकाने न्यायालयात सांगितले. तर न्यायाधीश धर्मेश शर्मा यांनी ११ आणि १२ सप्टेंबरला रुग्णालयात जाऊन पीडितेची साक्ष नोंदवून घेतली आहे.