चंदिगढ - हरियाणातील फरिदाबाद जिल्ह्यात अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून एका जोडप्याची गोळ्या घालून हत्या केली आहे. सुखबीर(२७) आणि मोनिका(२६) या दाम्पत्याचे मृतदेह पोलिसांना घरात आढळून आले आहेत. दोघांच्या शरीरावर बंदुकीच्या गोळीने जखमा झाल्याचे निशाण आहेत. मंगळवारी रात्री ही घटना घडली, तर आज सकाळी उघडकीस आली.
फरिदाबाद जिल्ह्यातील जसना गावात ही घटना घडली. गोळ्या मारण्यापूर्वी हल्लेखोरांनी जोडप्याचे हात बांधून टाकले होते. बुधवारी सकाळी दुधवाला घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. दुध घेण्यास महिला घराबाहेर न आल्याने दुधवाला घरात गेला असता त्याला घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह दिसले.
पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळविले आहे. चार संशयित घरात जाताना आणि येताना पोलिसांना दिसून आले आहेत. घरातील वस्तू अस्ताव्यस्त पसरलेल्या असून काही वस्तू अज्ञात हल्लेखोर घेवून गेले आहेत. हल्ल्यामागील उद्देश अजून स्पष्ट झाला नसून पोलीस तपास करत आहेत.