गांधीनगर : गुजरातच्या एका मंत्र्याच्या मुलावर कारवाई केल्यानंतर, राजीनामा द्यावा लागलेल्या सुनीता यादव या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा नवीन व्हिडिओ समोर आला आहे.
फेसबुकवर एका लाईव्ह सेशनमध्ये त्यांनी आपल्या राजीनाम्याचे कारण स्पष्ट केले आहे. त्या म्हणाल्या, "मी माझ्या भविष्यासाठी राजीनामा देत आहे. यानंतर आता मला आयपीएस परीक्षेच्या तयारीसाठी वेळ मिळेल. आयपीएस झाल्यानंतर जे सत्तेच्या गोष्टी करतात त्यांना मी माझे म्हणणे अधिक चांगल्या पद्धतीने समजावू शकेल."
"डिपार्टमेंटमध्ये माझ्यासोबत काम करणाऱ्या बऱ्याच महिला आणि पुरुष कर्मचारीही चांगल्या रितीने, प्रामाणिकपणे काम करु इच्छितात. मात्र, वरिष्ठांकडून येणाऱ्या दबावामुळे त्यांना तसे करता येत नाही", असेही त्या म्हणाल्या.
..तर माझीही निर्भया झाली असती
आठ जुलैला झालेल्या प्रकाराबाबत बोलताना त्या म्हणाल्या, की त्या रात्री माझ्यासोबत, माझ्या बाजूने बोलणारा 'पोलीस मित्र' नसता तर माझीही आणखी एक 'निर्भया' झाली असती. "तो पोलीस मित्र कोण होता मला माहिती नाही, मात्र तो अगदी देवासारखा त्याठिकाणी उपस्थित होता. तो नसता, तर माझ्यासोबत काहीही होऊ शकले असते, लोकांनी माझ्यासाठीही कदाचित नंतर कँडललाईट मोर्चे काढले असते..", असे त्या म्हणाल्या.
मला न्याय हवा आहे, मात्र त्यासाठी लढाच दिला पाहिजे असे काही नाही. मी न्याय मिळवेल, लोकांनी फक्त आता दिला तसाच पाठिंबा देत रहावे, जेणेकरुन माझा आत्मविश्वास कायम राहील; त्या म्हणाल्या.
काय होते प्रकरण..?
आठ जुलैच्या रात्री १०.३०च्या सुमारास सूरतमधील मंगध चौक येथे फिरणाऱ्या काही तरुणांना या महिला पोलिसाने हटकले होते. या तरुणांमध्ये गुजरातचे राज्य-आरोग्य मंत्री कुमार कनानी यांचा मुलगाही होता. तिने हटकल्यानंतर सुनिता आणि प्रकाश यांच्यामध्ये मोठा वाद झाला होता. या सर्व प्रकरणाचा व्हिडिओ आणि ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
यानंतर १२ जुलैला मंत्र्यांचा मुलगा आणि त्याच्या मित्रांना अटक करण्यात आली होती.