नवी दिल्ली - पूर्व लडाखमधील गलवान व्हॅली आणि इतरही भागात सुरु असलेला भारत चीनमधील सीमावाद निवळण्यास सुरुवात झाली आहे. विशेष प्रतिनिधी स्तरावरील चर्चेननंतर आता लष्करी अधिकाऱ्यांमध्ये पुढील चर्चा सुरु आहे. आज दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये लडाखमधील चूशूल सेक्टरमध्ये कार्प्स कमांडर स्तरावरील चर्चा सुरु आहे. चर्चेचा हा दुसरा टप्पा असून सीमेवरील तणाव आणखी कमी करणे हे बैठकीचे लक्ष्य आहे.
नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्यासाठी कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चा सुरु असल्याचे लष्करातील अधिकाऱ्यांनीही सांगितले. तणाव कमी करण्यासाठी राजनैतिक आणि लष्करी स्तरावर चर्चा सुरु राहील, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
5 जुलै रोजी भारत आणि चीनमध्ये विशेष प्रतिनिधी स्तरावर चर्चा झाली होती. यामध्ये भारताचे प्रतिनिधीत्व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल आणि चीनचे प्रतिनिधीत्व परराष्ट्र मंत्री वँग ई यांनी केले होते. दोघांमध्ये सविस्तर आणि मोकळेपणाने नियंत्रण रेषेवरील वादाबाबत चर्चा झाली होती. दोन्ही बाजूंनी जलदगतीने तणाव कमी करण्यासाठी पावले उचलण्याचे या चर्चेत ठरले होते. त्यानंतर पहिल्यांदा सीमावाद निवळण्यास सुरुवात झाली.
तणाव कमी करण्याच्या पहिल्या टप्प्यात चिनी सैनिक फिंगर 4 आणि फिंगर 5 भागातून मागे सरकले. तर गलवान व्हॅली, हॉट स्प्रिंग भागासह इतर ठिकाणांवरून चिनी सैनिक 2 किमीपर्यंत मागे सरकले आहे. भारतीय सैनिकही सीमेवरून मागे सरकले आहेत. सीमेवरील मोकळा भूभाग बफर झोन समजण्यात येणार आहे.