नवी दिल्ली - इराणमध्ये कोरोनाच्या दहशतीखाली अजूनही कित्येक भारतीय अडकले आहेत. यामधील काही भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी आणखी तीन विमाने पाठवण्यात येणार असल्याची माहिती विमान मंत्रालयाने दिली आहे. यामधील पहिली बॅच ही शुक्रवारी दुपारी मुंबईमध्ये पोहोचेल. यात साधारणपणे १३०-१५० नागरिकांना परत आणण्याचा मानस असल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केले.
इराणच्या वेगवेगळ्या प्रांतांमध्ये एकूण सहा हजारांहून अधिक भारतीय अडकले आहेत. यामध्ये साधारणपणे १,१०० भाविक, ३००हून अधिक विद्यार्थी आणि हजारहून अधिक मासेमारांचा समावेश आहे.
याप्रमाणेच, १४ मार्चला दुपारी १२.३० वाजता मुंबईहून आणखी एक विमान इराणला पाठवले जाईल, तर १५ मार्चला पहाटे १.४० च्या सुमारास दिल्ली विमानतळावरून तिसरे विमान इराणला पाठवण्यात येईल, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले.
देशातील आंतरराष्ट्रीय विमानतळे ही सतर्क आहेत. आतापर्यंत ९,८६२ विमानांमधील १०,५७,५०६ प्रवाशांची तपासणी विमानतळांवर करण्यात आली आहे, अशी माहिती नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिली. देशातील ३० विमानतळांवर तपासणी यंत्रणा सुरू असून, कोरोनाग्रस्त देशांतून आलेल्या प्रवाशांच्या सामानासाठी वेगळा कन्वेअर बेल्ट देण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा : COVID -19 : भारतातील रुग्णांची संख्या ७५ वर; घाबरू नका.. पंतप्रधानांचे आवाहन