जयपूर - देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाशी लढाई करण्यामध्ये 'कोरोना वॉरियर्स' म्हणजेच वैद्यकीय आणि पोलीस कर्मचारी मोलाची भूमिका बजावत आहेत. मात्र, हे लोकही कोरोनाला बळी पडत आहेत. त्यामुळे या लोकांनी स्वतःची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
राजस्थानच्या जयपूरमध्ये आतापर्यंत जवळपास ५२ वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यासोबतच कित्येक एएनएम वर्कर्सनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सवाई मानसिंग रुग्णालयामध्ये आतापर्यंत सर्वाधिक वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लागण झाल्याचे समोर आले आहे. रुग्णालयातील आठ डॉक्टरांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यांमध्ये सात रहिवासी डॉक्टरांचा समावेश आहे. यासोबतच, रुग्णालयातील चार परिचारिका आणि दोन वॉर्डबॉय यांनाही कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तसेच, शहरात पाच पोलीस कर्मचाऱ्यांनाही लागण झाल्याचे समोर आले आहे.
राज्याची माहिती बघता, जयपूरमध्ये २३, जोधपूरमध्ये ११, कोटामध्ये सात, नागौर मध्ये ३ तर, भीलवाडामध्ये ९ डॉक्टर आणि पोलिसांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. सवाई मानसिंग रुग्णालयातील घटनेपूर्वी, एसएमएस वैद्यकीय महाविद्यालयाच्या उपाहारगृह संचालकालाही कोरोना झाल्याचे समोर आले होते. यानंतर, रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.
राज्य सरकारने यावर पावले उचलत, प्रत्येक वैद्यकीय कर्मचाऱ्याला ५० लाखांचा विमा उपलब्ध करुन दिला आहे. यासोबतच राज्य सरकार मोठ्या प्रमाणात पीपीई किट उपलब्ध करुन देत आहे. यासोबतच, कोणा वैद्यकीय कर्मचाऱ्याला लक्षणे दिसून आल्यास, त्याला विलगीकरणात ठेवण्याचीही सोय राज्य सरकारने केली आहे.