जयपूर - इटलीहून राजस्थानमध्ये आलेल्या नागरिकाच्या पत्नीला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे काल (मंगळवार) समोर आले होते. आता पुण्यातील व्हायरॉलॉजी केंद्रानेही आपल्या अहवालात तिला कोरोनाचा संसर्ग झाल्याची पुष्टी दिली आहे. राज्याचे चिकित्सा मंत्री रघु शर्मा यांनी ही माहिती दिली.
इटलीहून जयपूरला आलेल्या इटलीच्या एका दाम्पत्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे काल समोर आले होते. या दोघांच्या प्राथमिक तपासणीमध्ये त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले होते. मात्र, खात्रीसाठी म्हणून त्यांच्या रक्ताचे नमुने पुण्याच्या व्हायरॉलॉजी केंद्रामध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यावेळी या दुसऱ्या अहवालातही तिला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
इटलीहून आलेल्या एकूण २३ पर्यटकांपैकी १६ जणांना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. हे पर्यटक आता कोठे कोठे फिरले, आणि त्यांनी कोणाकोणाची भेट घेतली त्यांचा शोध घेऊन त्या लोकांची तपासणी करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत अशा ९३ लोकांची तपासणी करण्यात आली आहे, असेही शर्मा यांनी स्पष्ट केले.
कोरोनाशी लढण्यासाठी सरकार पूर्णपणे सज्ज असून, राज्यात सात ठिकाणी तपासणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. तसेच उपचारासाठीही आवश्यक त्या सोई उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असे शर्मा यांनी सांगितले.
हेही वाचा : 'कोरोनाला सामोरे जाण्यासाठी सरकार कार्यरत; पंतप्रधान दररोज घेतायत आढावा..'